चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार पुलाखाली कोसळली; एकाचा मृत्यू, ५ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 10:55 PM2023-03-08T22:55:19+5:302023-03-08T22:56:08+5:30
चालकाचे अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
सिल्लोड/पालोद: खेळणा नदीच्या पुलावरून भरधाव वेगाने जाणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून खाली कोसळली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर कार मधील पाच प्रवासी गंभीर जखमी आहेत. हा अपघात जळगाव- सिल्लोड रस्त्यावर पालोद गावाजवळ असलेल्या पुलावर बुधवारी रात्री ९.१५ वाजता झाला.अजिनाथ रखमाजी सपकाळ( २८ रा. पालोद ) असे मृत कार चालकाचे नाव आहे. तर वैभव रतन साळवे २२ वय रा.पालोद, आकाश कचरू गवळी २६ वय रा.पालोद, ज्ञानेश्वर शेषराव काकडे २४ वय रा.पालोद ,
गंगाधर रामराव सुरडकर ३६ वय रा.पालोद, अजिनाथ फकीरराव सपकाळ ( ३८ वय रा.पालोद ) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. सुदैवाने नदीत पाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
सहाही जण कारमधून ( एम एच २२ यु ६४१४) सिल्लोडहून पालोदकडे येत होते. अपघाताची माहिती मिळताच उपसरपंच मचिंद्र पालोदकर, भाजप युवा मोर्चाचे सुनील मिरकर, योगेश लांडगे, धनंजय पालोदकर, योगेश पालोदकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी कर्मचाऱ्यासहित घटनास्थळी भेट दिली. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. अनिरुद्ध गायकवाड आरोग्य कर्मचारी आशिष देवडे, परिचारिका हेमा कोळी, मनीषा वाघ, प्रियांका खराटे, शेख मुमताज, जहाज कामगार प्रदीप तुपे, चांद पटेल, माधवराव जाधव यांनी जखमींवर तत्काळ प्राथमिक उपचार केले.