ग्रामस्थांच्या मेहनतीवर पाणी; वन कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जेरबंद बिबट्या निसटला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 02:18 PM2023-07-29T14:18:21+5:302023-07-29T14:21:37+5:30
गंगापूर तालुक्यातील पिंपरी शिवरात शेतकऱ्यांनी बिबट्याला चार तास ठेवले खिळवून
- जयेश निरपळ
गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) : शिकारीसाठी शेळ्यांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याला शुक्रवारी (२८) रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास स्थानिकांनी मोठ्या शिताफीने घेराव घालून जेरबंद केले. मात्र, बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे बिबट्या अंधरात पसार होण्यात यशस्वी झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी वन कर्मचाऱ्यांना धारेवर धरून रोष व्यक्त केला.
सध्या तालुक्यातील विविध भागात बिबट्याची दहशद मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याने ग्रामीण भागात शेतकरी भयभीत झाले आहे. अनेकदा दिवसा देखील बिबट्याचा वावर सर्रास वाढल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे मात्र विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील पिंपरी-रांजणगाव शिवारात गट क्रमांक १४३ मध्ये सुखदेव म्हस्के यांच्या शेत वस्तीवर तारेची जाळी असलेल्या शेळ्यांच्या गोठ्यात शिकारीसाठी बिबट्या शिरला होता. यावेळी बिबट्याने एका शेळीला जखमी केल्याने शेळ्यांच्या आवाजाने म्हस्के जागे झाले व त्यांनी परिसरात याबद्दल कल्पना दिली. शिवाय बॅटरीचा उजेड सातत्याने बिबट्याच्या डोळ्यावर धरून ठेवल्याने बिबट्याला काहीही दिसेनासे झाल्याने तो एकाच जागी थांबून होता.
दरम्यान, परिसरातील तरुण मोठ्या संख्यने म्हस्के यांच्या शेतावर जमा झाले. चारही बाजूने बिबट्याला घेराव घातला. त्यांनी याबद्दल वन कर्मचाऱ्यांना माहिती दिली वन अधिकारी कर्मचाऱ्यांना तेथे पोहचण्यासाठी रात्रीचे अंदाजे एक वाजले होते. तोपर्यंत तरुणांनी बिबट्याला जागचे हलू दिले नव्हते. विशेष म्हणजे, यादरम्यान बिबट्याला एकाही शेळीची शिकार करता आली नाही. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी आलेल्या दोन वन अधिकारी व चार कर्मचाऱ्यांनी सोबत कोणताही पिंजरा किंवा बिबट्याला जेरबंद करण्यासाठी साहित्य आणले नव्हते. यावेळी त्यांनी उपस्थित तरुणांना सुरक्षिततेच्या दृष्टीने बाजूला केले. हीच संधी साधत बिबट्या गोठ्याच्या जाळी खालून पसार झाला.
शेतकऱ्यांनी दोन ते तीन तास मोठ्या मेहनतीने बिबट्याला पकडण्यासाठी खिळवून होते. मात्र वन कर्मचाऱ्यांना त्याला अटकाव करताना किंवा ताब्यात घेताना अपयश आल्याने उपस्थित तरुण शेतकरी व ग्रामस्थांनी वन कर्मचाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र या ठिकाणी पूर्वीपासूनच असलेल्या गंगापूर पोलिसांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांची समजूत घातली. मध्यरात्री तीन ते चार तास कोणतेही प्रशिक्षण नसताना शेतकऱ्यांनी मेहनतीने राबविलेल्या बिबट्या पकडण्याच्या मोहिमेवर प्रशिक्षित वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे अपयश आले. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.