तलाठ्यांच्या बदल्या, एसडीएमऐवजी जिल्हाधिकारी पदस्थापना देणार असल्याने प्रस्थापितांना धडकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:31 AM2024-08-14T11:31:06+5:302024-08-14T11:36:42+5:30

मागील काही वर्षांपासून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तलाठ्यांचे बदल्यांचे अधिकार होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी त्यात मर्जीनुसार अनेकांना प्रतिनियुक्त्या देत. यात अनेकदा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या.

As the transfer of Talathis, Collectors will be posted instead of SDMs, the establishment will suffer | तलाठ्यांच्या बदल्या, एसडीएमऐवजी जिल्हाधिकारी पदस्थापना देणार असल्याने प्रस्थापितांना धडकी

तलाठ्यांच्या बदल्या, एसडीएमऐवजी जिल्हाधिकारी पदस्थापना देणार असल्याने प्रस्थापितांना धडकी

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील तलाठ्यांच्या बदल्या आता उपविभागीय अधिकारी (एसडीएम) ऐवजी जिल्हाधिकारी करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रस्थापित तलाठ्यांना धडकी भरली आहे. बदल्या करताना किमान जवळचे ठिकाण मिळावे, यासाठी तलाठी संघटनेने मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांची भेट घेऊन मागणी केली. जिल्ह्यात कन्नड, वैजापूर, पैठण, सिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगर असे पाच उपविभाग असून त्यांच्या अंतर्गत ४९० तलाठी सजा आहेत. एका सजाअंतर्गत २० ते २५ गावांचा कारभार आहे.

मागील काही वर्षांपासून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तलाठ्यांचे बदल्यांचे अधिकार होते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी त्यात मर्जीनुसार अनेकांना प्रतिनियुक्त्या देत. यात अनेकदा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या. यातूनच माजी विभागीय आयुक्तांनी चौकशी समिती देखील नेमली असून समिती चौकशी करीत आहे. वानगी दाखल सांगायचे म्हटले, तर शेकटा येथील तलाठ्याला प्रतिनियुक्ती देत अब्दीमंडीमधील शत्रूसंपत्तीचा फेर घेण्यासाठी नियुक्त केले होते. संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचे निलंबनही शासनाने केले होते. या प्रकारांना आळा बसण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर बदल्यांचे अधिकार शासनाने दिले असून १५ ऑगस्टपूर्वी सर्व बदल्या होण्याच्या सूचना १२ ऑगस्टच्या आदेशानव्ये केल्या आहेत. आता बदल्यांमध्ये पारदर्शकता राहते की संघटना शिष्टमंडळाच्या भेटीनुसार प्रशासन निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

समुपदेशन केले कुणाचे...
समुपदेशनाने बदल्या करण्याचे शासनाचे आदेश आहेत; परंतु ४९० सजांवर कार्यरत तलाठ्यांचे समुपदेशन कुणी व कधी केले हा प्रश्न आहे. ऑनलाईन बदल्या करण्यात तांत्रिक अडचणी आहे. त्याला विलंब लागणार आहे. त्यामुळे बदली करताना लगतच्या उपविभागामध्ये तलाठ्यांची बदली करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत.

विनंती बदल्यांचे अधिकार आयुक्तांना...
महसूल मंत्र्यांना असलेले विनंती बदल्यांचे अधिकार आता विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यात अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लघु टंकलेखक, महसूल सहायक, वाहनचालक, तलाठी या गट क- कर्मचाऱ्यांच्या कलम ४ (४) दोन व कलम ४ (५) नुसार बदल्यांचे महसूल मंत्र्यांचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील महसूल क्षेत्र असे...
महसुली गावे : १३६२
उपविभाग : ५
मंडळ : ८४
तलाठी सजा : ४९०
ग्रामपंचायती : ८६७
ग्रामीण लोकसंख्या : २० लाख
एकूण लोकसंख्या : ३७ लाख १ हजार २८२

Web Title: As the transfer of Talathis, Collectors will be posted instead of SDMs, the establishment will suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.