वंचित आघाडीला दिलेला ‘तलाक’नामा अधिकृत, असदुद्दीन ओवेसी यांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 03:08 AM2019-09-11T03:08:09+5:302019-09-11T03:08:29+5:30
भविष्यात पुन्हा युती करण्याच्या मुद्द्यावर मात्र मौन
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीला ‘तलाक’ देण्याचा निर्णय मागील आठवड्यात एमआयएम पक्षाने घेतला. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पक्षाची भूमिका मांडली. ही भूमिका एकट्या जलील यांची नसून पक्षाची आहे, असे मत आज हैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मांडले. भविष्यात पुन्हा वंचितसोबत युती होईल का? या थेट प्रश्नावर त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.
शुक्रवारी खा. इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीला एमआयएम ‘तलाक’ देत असल्याचे पत्रक काढले. एमआयएमला विधानसभा निवडणुकीत फक्त ८ जागा देण्यात येत आहेत. औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणुकीतून पक्षाचा एक आमदार निवडून आलेला असताना, हा मतदारसंघ एमआयएम पक्षाला देण्यात आला नाही. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय आम्ही घेत असल्याचे पत्रात नमूद केले होते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही जलील यांच्या तलाकनाम्याला महत्त्व न देण्याचे ठरविले. जोपर्यंत खा. असदुद्दीन ओवेसी अधिकृतपणे घोषणा करणार नाहीत, तोपर्यंत युती कायम असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मंगळवारी एमआयएमच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती औरंगाबादेत घेण्याचे काम सुरू केले. पहिल्याच दिवशी नांदेड जिल्हा, नाशिक जिल्हा आणि पुण्यातील वडगाव शेरी विधानसभेसाठी मुलाखती घेण्यात आल्या.
महाराष्ट्रातील निर्णय महाराष्ट्र युनिट घेणार
हैदराबाद येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओवेसी यांनी नमूद केले की, इम्तियाज जलील यांनी घेतलेला निर्णय ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे. महाराष्ट्रात किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणी लढवायच्या, याचा संपूर्ण निर्णय महाराष्ट्र युनिट घेणार आहे.