आशेला लावून गेलेला एक ‘फैजान’...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 07:24 PM2017-07-25T19:24:03+5:302017-07-25T19:35:48+5:30
आपला मुलगा मरणाच्या दारात शेवटची घटिका मोजत आहे आणि आपण काहीच करू शकत नाही, ही हतबलता कोणत्याही आई-बापासाठी दु:स्वप्नच आहे. हे दु:स्वप्न घेऊन एजाज आणि फरहीन सय्यद हे दाम्पत्य गेल्या साडेसहा वर्षांपासून जगत आहे. जीवनमरणाच्या उंबरठ्यावर सहावर्षीय चिमुरड्याची झुंज; मुख्यमंत्र्यांपासून अधिका-यांपर्यंत सर्वच मदतीला धावले.
ऑनलाईन लोकमत/मयूर देवकर
औरंगाबाद : आपला मुलगा मरणाच्या दारात शेवटची घटिका मोजत आहे आणि आपण काहीच करू शकत नाही, ही हतबलता कोणत्याही आई-बापासाठी दु:स्वप्नच आहे. हे दु:स्वप्न घेऊन एजाज आणि फरहीन सय्यद हे दाम्पत्य गेल्या साडेसहा वर्षांपासून जगत आहे. सताड उघड्या डोळ्यांना दिसणारे हे दु:स्वप्न कधी तरी सरेल या आशेवर ते सर्व शक्ती पणाला लावून आजतागायत प्रयत्न करीत आले. अखेर १८ जुलै रोजी त्यांचा हा लढा संपला.
सेट परीक्षेसह पीएच.डी.धारक एजाज यांचे वयाच्या २६ व्या वर्षी फरहीन यांच्याशी २०१० साली लग्न झाले. दुसºयाच वर्षी त्यांच्या आयुष्यात फैजान आला. फैजानचा अर्थ यशस्वी आणि परोपकारी. आमच्या आयुष्यात येऊन त्याने खरोखरच उपकार केले, असे एजाज सांगतात. सय्यद दाम्पत्याच्या जीवनात आनंद घेऊन येणाºया फैजानला अवघ्या तिस-या महिन्यातच ‘बायलरी अॅट्रेशिया’ या यकृताच्या आजाराने ग्रासले. पुण्याच्या एका प्रसिद्ध दवाखान्यात उपचारही घेतले. सर्व काही ठीक झाल्यासारखे वाटत असताना, ‘भविष्यात फैजानला यकृत प्रत्यारोपण करावेच लागेल’ व त्यासाठी सुमारे ५५ लाख खर्च येईल, डॉक्टरांच्या या भविष्यवाणीने सय्यद दाम्पत्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
विनाअनुदानित शाळेवर शिक्षक असणा-या एजाज यांना एवढा खर्च करणे शक्यच नव्हते. देवाच्या कृपेने सर्व काही ठीक होईल म्हणून ते औरंगाबादला आले. फैजानची तब्येत काही सुधारली नाही. दर महिन्याला १५-२० हजार रुपयांची औषधी आणि पुण्याला नियमित तपासणी, असा लाखो रुपयांचा खर्च मोठ्या हिमतीने त्यांनी केला. जणू काही मुलाच्या प्रत्येक श्वासासाठी ते पै-पै मोजत होते. शेती विकली, पत्नीचे दागिने मोडले, व्याजाने पैसे घेतले, पण मुलाच्या उपचारामध्ये कमी पडू दिली नाही. या काळात माझ्या कुटुंबियांनी मला खूप साथ दिली. विशेषत: माझे बंधू आणि मेव्हण्यांचे तर मी कसे आभार व्यक्त करू हेच कळत नाही, असे एजाज सांगतात.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात फैजान सहा वर्षांचा झाला. धूमधडाक्यात त्याचा वाढदिवस साजरा केला. जून महिन्यात त्याला पहिलीत शाळेत टाकण्याचे स्वप्न आई-वडील पाहू लागले; मात्र एप्रिल महिन्यात त्याची तब्येत खूपच खालावली. औरंगाबादमध्ये उपचार शक्य नसल्यामुळे पुन्हा पुणे गाठले. डॉक्टरांनी लवकरात लवकर यकृत प्रत्यारोपण करा, अन्यथा मुलाचा जीव जाईल, असे स्पष्ट सांगितले. हे शब्द कोणत्याही पालकाला हेलावून सोडणारे होते.
जीवाची मुंबई
एजाज यांनी पैशाची जुळवा-जुळव करण्यासाठी पुणे-मुंबईच्या आर्थिक मदत करणा-या शेकडो सामाजिक संस्थांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. एजाज सांगतात, ‘एनजीओ कार्यालयांना भेटी देण्यात मी संपूर्ण मुंबई पालथी घातली. प्रत्येकाला परिस्थिती-अडचणी सांगायचो, त्यांना मदतीची कळकळीने विनंती करायचो. त्यानंतर मग कोणी आश्वासन द्यायचे, कोणी स्पष्ट नकार द्यायचे, अगदी एक हजार रुपयांपासून जी मिळेल ती मदत मी जमा करीत होतो; पण ते पुरेसे नव्हते.
कोणी तरी त्यांना मुख्यमंत्र्यांचे सचिव ओमप्रकाश शेट्ये यांना भेटण्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे ते काम पाहतात. त्यांची भेट घेऊन एजाज यांनी सर्व हकिगत सांगितली. त्यांनी मदतीचे आश्वासन देत फैजानला पुण्याहून मुंबईला आणण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मुंबईच्या एका महागड्या रुग्णालयात फैजानवर उपचार सुरू झाले. शेट्ये यांनी शासनातर्फे त्वरित तीन लाख रुपयांची मदत दिली, तसेच टाटा ट्रस्टकडून ४.५ लाख रुपये आणि एका खासगी देणगीदाराकडून २ लाख रुपयांची मदतही उभी केली. ‘शेट्ये साहेबांनी अत्यंत तत्परतेने आम्हाला खूप मदत केली. रुग्णालयाला वैयक्तिकरीत्या सूचना देऊन फैजानला सर्वोत्तम उपचार मिळतील याची व्यवस्था केली.’
फैजानला यकृत देण्यासाठी वडिलांच्या २२ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांमध्ये सफल ठरल्यानंतर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली; मात्र फैजानचे अवयव उपचारांना प्रतिसाद देत नसल्यामुळे डॉक्टरांनी एवढ्या लहान मुलावर प्रत्यारोपण करण्यास असमर्थता दर्शविली. शेट्ये यांनी मुंबईतीलच एका दुस-या दवाखान्यात भरती होण्यास सांगितले. या तीन महिन्यांच्या काळामध्ये मी शेट्ये साहेबांच्या कायम संपर्कात होतो. माझी कोणाशीच ओळख नाही; पण ते माणुसकीच्या नात्याने सदैव माझ्या मदतीला धावून आले. ३० लाख रुपयांचा खर्च त्यांनी दवाखान्याकडून १५ लाख रुपयांपर्यंत कमी करून दिल्याचे एजाज म्हणाले.
जून महिन्याच्या सुरुवातीला फैजानला दुस-या दवाखान्यात दाखल केले. २६ जूनला ईदसाठी त्याला सुटी देण्यात आली. सय्यद कुटुंबियांनी त्याच्या आरोग्याची मनापासून दुआ मागितली. प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांनी १९ जुलै ही तारीख निश्चित केली. मुंबईपासून जवळ म्हणून फैजान आपल्या मामाकडे पुण्यातच राहिला. जसजशी १९ तारीख जवळ येत होती तशी एजाज आणि फरहीन यांची काळजी वाढत होती. ओमप्रकाश शेट्ये यांनी दवाखान्याच्या खर्चाबाबत निश्चिंत राहण्यास सांगितले. त्यामुळे आर्थिक प्रश्न मिटला होता. दिल्लीहून तज्ज्ञ डॉक्टर बोलावण्यात आले होते.
१६ जुलैच्या सायंकाळी फैजानची तब्येत अचानक बिघडली. त्याला मुंबईला दवाखान्यात भरती करण्यात आले. १७ जुलैच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी एजाज यांना बोलावून सांगितले की, आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहोत, मात्र पुढील दोन-तीन तासांमध्ये तुम्हाला दु:खद बातमी मिळण्याची शक्यता आहे. हे ऐकून सुन्न झालेले एजाज आणि त्यांचे मेव्हणे विसाव्या मजल्यावर बसले. रात्री २ वाजता त्यांच्या नावाची घोषणा झाली. ‘विसाव्या मजल्यावरून एकोणिसाव्या मजल्यापर्यंत जाताना प्रत्येक पाऊल जड झाले होते. आपल्या मुलाच्या शेवटाची बातमी माझ्या कानावर पडणार असल्यामुळे तो एका मजल्याचा प्रवास मला सर्वात वेदनादायक होता.’
यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया एका दिवसावर आलेली असताना फैजानची प्राणज्योत मालवली. मागच्या साडेसहा वर्षांचा त्याचा लढा असफल ठरला. फैजानच्या आईचा डोळा लागलेला होता. त्यांना न सांगताच वडिलांनी दवाखान्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या. सकाळी साडेचार वाजता उठल्यानंतर मुलगा गेल्याचे कळताच त्यांनी टाहो फोडला. एजाज यांनी शेट्ये यांना मेसेज करून ही दु:खद बातमी कळवली. त्यांनी दवाखान्याला सूचना करून आतापर्यंत झालेला ७-८ लाख रुपयांचा खर्च न घेता सय्यद कुटुंबियांना जाऊ द्या, असे सांगितले.
आशेच्या एवढ्या जवळ येऊनही फैजान आज आमच्यासोबत नाही, याचे अतीव दु:ख आहे. मात्र, त्यांच्या उपचारांमध्ये आम्ही काही कमी पडू दिली नाही. विशेष करून ओमप्रकाश शेट्ये यांनी केलेल्या मदतीमुळे आम्ही हे धाडस करू शकलो. अखेर नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. त्याला आपण तरी काय करणार, या शब्दांत एजाज यांनी भावना मोकळ्या केल्या. त्यांचा लहान मुलगा रिझवान (२) आता त्यांच्या जीवनाची एकमेव आशा आहे.
मुख्यमंत्र्यांची अशीदेखील माणुसकी
मुंबईच्या रुग्णालयात वैयक्तिक कामानिमित्त आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फैजानची भेट घेतली होती. एजाज यांना मदतीचे आश्वासन देत देवावर विश्वास ठेवण्यास सांगितले. एवढेच नाही, तर स्वत:चा खासगी मोबाइल क्रमांक दिला. ते आवर्जून फैजानच्या उपचारांची माहिती घेत. एजाज यांनी जेव्हा फैजानच्या मृत्यूची बातमी मेसेजद्वारे कळविली, तेव्हा फडणवीसांनी रिप्लाय केला की, ‘ईश्वराची मर्जी आहे, आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत.’ ओमप्रकाश यांनीदेखील हळहळ व्यक्त करीत एजाज यांना मेसेज केला की, ‘माझा हरलेला चेहरा तू पाहू शकणार नाहीस...हरलेल्या लढाईचे घाव आयुष्यभर मनावर कायम राहतील.’