‘असावा सुंदर चॉकलेटचा बाप्पा’, चॉकलेटच्या गणेश मूर्तीचे १०१ लिटर दुधात होणार विसर्जन
By प्रशांत तेलवाडकर | Published: September 8, 2022 07:19 PM2022-09-08T19:19:11+5:302022-09-08T19:20:20+5:30
कसबा गणपतीसारखी मांडी घातलेली; पण चॉकलेटपासून तयार केलेली गणेशाची मूर्ती यंदाचे आकर्षण ठरली.
औरंगाबाद : ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ हे बडबड गीत सर्वांनी ऐकले होते. मात्र, यंदा औरंगाबादेत चक्क ‘चॉकलेटचा गणपती’ तयार करण्यात आला. ११ किलो वजनाची मूर्ती आबालवृद्धांचे आकर्षण ठरली. शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी १०१ लिटर दुधात या चॉकलेटच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.
कसबा गणपतीसारखी मांडी घातलेली; पण चॉकलेटपासून तयार केलेली गणेशाची मूर्ती यंदाचे आकर्षण ठरली. त्यावर अलंकार, पुष्पहार टोपही तयार करण्यात आला, तोही चॉकलेटपासूनच. शहरातील व्यापारी हनुमान दरख यांनी ही मूर्ती बनविली. यासाठी ११ किलो चॉकलेटचा वापर करण्यात आला. मूर्ती सव्वा फूट उंचीची आहे. १० दिवस १० प्रकारच्या मोदकाचा प्रसाद वाटप करण्यात येत होता. अनंत चतुर्दशीला सिडको एन-१ येथे मूर्तीचे १०१ लिटर दुधात विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे. त्यापासून चॉकलेट मिल्क शेक तयार करून तोच प्रसाद सर्वांना वाटण्यात येणार आहे, अशी माहिती दरख यांनी दिली.