आशा, गटप्रवर्तक, ‘सीएचओं’चे कामबंद आंदोलनाने ग्रामीण आरोग्यसेवा विस्कळीत
By विजय सरवदे | Published: November 1, 2023 01:17 PM2023-11-01T13:17:16+5:302023-11-01T13:17:50+5:30
जिल्ह्यात १८३३ आशा स्वयंसेविका, ९१ गटप्रवर्तक आणि २०१ समूह आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रस्तरावर कार्यरत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मागील १४ दिवसांपासून आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे, तर सोमवारपासून समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी संप सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे.
जिल्ह्यात १८३३ आशा स्वयंसेविका, ९१ गटप्रवर्तक आणि २०१ समूह आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रस्तरावर कार्यरत आहेत. मात्र, १४ दिवसांच्या संपामुळे गृहभेटी देऊन गरोदर माता व बालकांचे लसीकरण, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गरोदर मातांची घरोघरी जाऊन नोंदणी, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेसाठी आवश्यक आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढणे अशा एकूण ५६ इंडिकेटर्स असलेली कामे विस्कळीत झाली आहेत. त्यामुळे सध्या तरी जिल्हा आरोग्य विभागासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले की, आशा व गटप्रवर्तक यांच्या संपामुळे ग्रामीण आरोग्यसेवेवर परिणाम झाला आहे. एवढेच नाही, तर सोमवारपासून जिल्ह्यातील समूह आरोग्य अधिकारीदेखील संपावर गेले आहेत. त्यामुळे उपकेंद्रस्तरावर ओपीडी बंद झाली आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनस्तरावरच्या आहेत.
किमान वेतन कायद्यानुसार आशा स्वयंसेविकांना २६ हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना २८ हजार रुपये वेतन द्यावे, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचे धोरण राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे गटप्रवर्तकांनाही इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत नियमित करावे, बोनस जाहीर करावा, आशा स्वयंसेविकांना ऑनलाइन कामाची सक्ती करू नये, या मागण्यांसाठी ‘सीटी’प्रणीत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली १४ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
उपकेंद्रांची ‘ओपीडी’ बंद
समूह आरोग्य अधिकाऱ्यांनी (सीएचओ) ३० ऑक्टोबर, सोमवारपासून संप पुकारला आहे. त्यामुळे कालपासून जिल्ह्यातील २६९ आरोग्य उपकेंद्रांत ‘ओपीडी’ बंद झाली आहे. कायमस्वरूपी सेवा करा, अशी त्यांची मागणी आहे. ‘सीएचओं’च्या संपामुळे साथरोग नियंत्रण, नाक, कान, घसा या आजारांवरील उपचारास विविध १३ सेवांवर परिणाम झाला आहे.