Ashadhi Ekadashi: जय हरी विठ्ठल! जर्मनीत उभारले ‘विठ्ठलधाम’, निघाली पांडुरंगाची दिंडी
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 30, 2023 08:30 PM2023-06-30T20:30:41+5:302023-06-30T20:31:27+5:30
आषाढी एकादशीनिमित्त भारताप्रमाणेच जर्मनीची राजधानी बर्लिन येथेही मराठी बांधवांनी पांडुरंगाची दिंडी काढण्यास सुरुवात केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : जर्मनी या देशात ‘विठ्ठलधाम’ उभारण्यात आले आहे. होय, येथे भारतातून नोकरी, व्यवसायासाठी गेलेल्या एनआरआयची संख्या मोठी आहे. यामुळे जर्मनीत हिंदू देव-देवतांची मंदिरे उभारली जात आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त भारताप्रमाणेच जर्मनीची राजधानी बर्लिन येथेही मराठी बांधवांनी पांडुरंगाची दिंडी काढण्यास सुरुवात केली आहे. यापुढे जाऊन येथील फुल्डा नावाच्या शहराजवळ ‘किर्शहाईम’ या गावात ‘विठ्ठलधाम’ मंदिर उभारण्यात आले आहे. येथे नुकताच १५ ते १९ जून दरम्यान विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यामुळेच छत्रपती संभाजीनगरातील रहिवासी; पण आता बर्लिन येथे स्थायिक झालेले अमित सोमाणी व अन्य ५० भाविकांनी या सोहळ्यास हजेरी लावली होती.
यासोबत बर्लिनमधील मराठी भाषिकांनीही ‘विठ्ठलधाम’ पाहण्यासाठी गर्दी केली होती. चार दिवसीय महोत्सवात ‘किर्शहाईम’ येथे हजारावर भाविकांनी मंदिराला भेट दिली. या ‘विठ्ठलधाम’ परिसरात छोटेसे तळे आहे. त्याचे ‘चंद्रभागा’ असे नामकरण करण्यात आले. जर्मनीतील हे दुसरे मोठे मंदिर आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास भारताचे महावाणिज्यदूत डॉ.अमित तेलंग व त्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली. यावेळी भाविकांनी ‘विठ्ठला’चे भजन केले. त्यानंतर ‘जय हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण’ हरी असा गजरही केला. यावेळी युरोपियन बांधवांनीही या भजनात सहभागी होऊन आनंद लुटला.
कोणी बांधले ‘विठ्ठलधाम’?
स्वामी विश्वानंद यांचे शिष्य स्वामी माधव महाराज आणि विठ्ठलधाम आश्रमाच्या संघाने हे विठ्ठलधाम उभारले.
विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणली जयपूरहून
जयपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती बनविण्यात आली. काळ्या पाषाणातील ६ फूट उंचीच्या या मूर्ती आहेत.
प्राणप्रतिष्ठा कोणी केली?
अहोबिलम मठातील आचार्य लक्ष्मीनारायण आणि त्यांच्यासोबत मॅारिशस येथील पुजारी देवा कुमार यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.
भिंतीवर भगवद्गीतेचे श्लोक
विठ्ठलधामच्या भिंतीवर भगवद्गीतेतील श्लोक वाचण्यास मिळतात. संस्कृतमधील श्लोक व त्यांच्या जर्मनी भाषेत केलेल्या भाषांतराच्या फ्रेम येथे आजूबाजूला लावण्यात आल्या आहेत.