नाथाचरणी वारकरी रिता जाऊ नये; सेवाभावातून ३३ वर्षांपासून साबुदाणा खिचडीचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 07:24 PM2023-06-29T19:24:44+5:302023-06-29T19:25:10+5:30
आज तब्बल १५ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले
पैठण: आषाढी एकादशीला आलेल्या जवळपास पन्नास हजारांहून अधिक भाविकांना पैठणच्या संत एकनाथ सेवा संघाच्यावतीने साबुदाणा खिचडीचा प्रसाद आज वितरीत करण्यात आला. विशेष म्हणजे, संघाचे मोफत खिचडी वाटप करण्याचे यंदाचे ३३ वे वर्ष आहे. आज तब्बल १५ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आल्याने सुरेश शिंदे यांनी सांगितले.
पंढरपूरनंतर वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेले एकमेव तिर्थक्षेत्र म्हणून पैठण आहे. वारकऱ्यांची संत एकनाथ महाराजावर मोठी श्रद्धा आहे. पंढरपूर प्रमाणेच दर एकादशीला वारकरी लाखोंच्या संख्येने पैठण येथे हजेरी लावतात. पांडुरंगाचे, नाथांचे भक्त असलेले वारकरी म्हणजे काबाडकष्ट करणारे शेतकरी, तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीत ऊन, वारा, तहान भूक याची पर्वा न करता फक्त दर्शनाच्या ओढीने पैठण शहरात हजेरी लावतात. कपाळावर नाथांच्या पादुकेवरील बुक्का लावला की त्यांचे समाधान होते. मग प्रशासनाने काय सुविधा दिल्या, काय दिल्या नाहीत याचा साधा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. असेल तसे निभावून न्यायचे हीच समाधानी वृत्ती वारकरी संप्रदायाची चालत आली आहे.
नाथांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्ताच्या मुखात प्रसाद रूपी दोन घास पडावे, नाथांच्या मंदीरातून कोणीही उपाशी जावू नये या विचाराने बबनराव उर्फ माऊली मडके, सुरेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना झपाटून टाकले. सन १९९१ ला एकादशीला नाथमंदीरात साबुदाणा खिचडी करून वारकऱ्यांना मोफत वाटपाचा त्यांनी संकल्प केला. यासाठी दानशूर भक्तांची मदत घेण्यात आली. १९९१ ला एकादशीच्या दिवशी ५० किलोचा साबुदाणा आणून त्याची खिचडी प्रसाद म्हणून वाटला. ५० किलो पासून सुरू झालेला खिचडीचा प्रसाद पुढे २५ क्विंटल पर्यंत पोहचला. या उपक्रमाने ३३ वर्षाचा टप्पा ही पार केला. बबनराव उर्फ माऊली यांनी सुरू केलेल्या या उपक्रमात गेल्या २५ वर्षापासून सुरेश शिंदे, भाऊसाहेब चव्हाण, केशव भाग्यवंत सातत्याने योगदान देत आहेत. श्रमदानासाठी २५ वर्षाच्या काळात अनेक मान्यवरांनी आपली सेवा या उपक्रमासाठी अर्पित केली आहे.
खिचडीसाठी भाविक भक्ताकडून दान दिले जाते. साबुदाणा, शेंगदाणे, तूप आदीसह भक्तदान आणून देतात. यातून ३३ वर्षापासून दर एकादशीला खिचडी तयार करून वाटतो आहे. दान मिळो अगर न मिळो खिचडी वाटपात खंड करण्यात येत नाही, दर महिण्याच्या एकादशीला १० क्विंटल तर आषाढी व कार्तिकी एकादशीला २१ ते २५ क्विंटलपर्यंत साबुदाणा खिचडी तयार करावी लागते, असे माऊली मडके यांनी सांगितले.
५० हजार भाविकांना वाटप
आज जवळपास ५० हजार भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. गुरुवारी अंकुशराव काळे, कल्याण कोकणे, नारायणगाव भजणी मंडळ, अरूण चव्हाण, सुरेश लिपाणे, भाऊसाहेब चव्हाण, आदीसह अनेक सेवेकऱ्यांनी प्रसाद वाटप करण्यासाठी श्रमदान केले.