आषाढी, मोहर्रमला छत्रपती संभाजीनगरात निर्जळी; जलवाहिनी फुटल्याने २६ तास पाणीपुरवठा बंद
By मुजीब देवणीकर | Published: July 18, 2024 02:10 PM2024-07-18T14:10:13+5:302024-07-18T14:14:28+5:30
ऐन सणासुदीच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला.
छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविणारी १२०० मिमीची जलवाहिनी मंगळवारी सकाळी ८ वाजता ढोरकीन येथे फुटली. जलवाहिनीची दोन वेळेस दुरुस्ती, त्यानंतर जायकवाडीच्या विद्युत पॅनलमधील बिघाड दूर करण्यासाठी मनपाला तब्बल २६ तास लागले. शहरात एक थेंबही पाणी न आल्याने जलकुंभ कोरडे पडले. ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. अनेक नागरिकांना वापरण्यासाठी खासगी टँकर, पिण्यासाठी जार आणावे लागले. शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सद्य:स्थितीत तीन जलवाहिन्या आहेत. सर्वांत मोठी जलवाहिनी म्हणजे १२०० मिमी व्यासाची होय. याच जलवाहिनीने मंगळवारी सकाळी ढोरकीन गावाजवळ दगा दिला. दुपारी अडीच वाजेपर्यंत मनपाने दुरुस्तीचे काम पूर्णही केले होते. तपासणीत काही प्रमाणात गळती राहिल्याचे लक्षात आले. मग परत दुरुस्तीला सुरुवात करावी लागली. ज्या ठिकाणी दुरुस्ती करायची होती, तेथील जलवाहिनीचा पत्रा बराच नाजूक झालेला होता. मध्यरात्री दोन वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. पंप सुरू करण्यास जायकवाडीत सांगण्यात आले. तेथील विद्युत पॅनलमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. दुरुस्तीची कामे यांत्रिकी विभागाने केली. सकाळी १०:३० वाजता जायकवाडीतील उपसा पंप सुरू करण्यात आले. दुपारी एक वाजेनंतर शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली. शहराचा पाणीपुरवठा जवळपास २६ तास बंद होता.
आषाढी आणि मोहर्रम
बुधवारी शहरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी उपवास ठेवले होते. त्याचप्रमाणे मुस्लिम बहुल भागात मोहर्रमनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ऐन सणासुदीच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. खासगी टँकर आणि पाण्याचे जार मागवून तहान भागवावी लागली.
दुपारनंतर टप्पे सुरू
शहरात पाणी येण्यास सुरुवात झाल्यावर दुपारी ३ ते ४ वाजेनंतर शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पे सुरू करण्यात आले. मंगळवारी ज्या वसाहतींना पाणी देता आले नाही, त्यांना बुधवारी प्राधान्याने पाणी देण्यात आले. बुधवारी ज्या वसाहतींना पाणी देण्याचा दिवस होता, त्यांना गुरुवारी पाणी मिळेल, असे मनपाकडून सांगण्यात आले.
काही वसाहतींना कमी दाबाने पाणी
१२०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंद असताना जुन्या शहराची ७०० मिमी आणि नव्याने टाकलेली ९०० मिमीची जलवाहिनी सुरू होती. या दोन्ही जलवाहिन्यांद्वारे शहरात ३० ते ३५ एमएलडी पाणी येत होते. काही वसाहतींना अत्यंत कमी दाबाने पाणी देण्याचा प्रयत्न केल्याचे मनपाकडून कळविण्यात आले.