आशासेविका बनल्या आरोग्य व्यवस्थेचा कणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:05 AM2021-05-10T04:05:32+5:302021-05-10T04:05:32+5:30
खंडाळा : कोरोनाच्या वाढत्या संसर्ग काळात ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविका आरोग्य व्यवस्थेचा ...
खंडाळा : कोरोनाच्या वाढत्या संसर्ग काळात ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविका आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून काम करीत आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत गावस्तरावर नागरिक व आरोग्य विभाग यांच्यातील दुवा अशी त्यांची भूमिका असते.
वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी खंडाळा गावाची ओळख. या गावात मुक्ता भोकरे, शाईन शेख, नीलिमा जाधव, वैशाली शिंदे, वंदना अभंग, वंदना बागुल, वनिता ढगे, गायत्री पुरोहित, स्वाती मगर, अरुणा चौधरी या दहा आशासेविका काम करीत आहेत. वर्षभरापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गावागावात जाऊन आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी आशा सेविका जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावित आहेत. कोरोनाची पहिली लाटेत आशा सेविकांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खूप परिश्रम घेतले. दुसरी लाट सुरू झाल्यापासून तर त्यांच्यावरील कामाचा ताण अधिक वाढला आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन संशयित रुग्णांचे स्वॅब घेतले जातात. त्यात होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांची नियमित तपासणी, गोळ्या वाटप करणे, मार्गदर्शन करणे आदी कामे आशा सेविका करीत आहेत. सर्वेक्षण करण्यासाठी थर्मलगन आणि ऑक्सिमीटरच्या सहाय्याने तपासणी केली जाते. हे काम करीत असताना त्यांच्या जीवितेला धोका निर्माण झाला आहे. खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून आशा सेविका आपली भूमिका साकारत आहेत.
आम्ही चोवीस तास काम करतो. लॉकडाऊनच्या काळात इतके काम वाढलेले आहेत. शासनाच्या आदेशानुसार आम्ही ते सर्व कामे करतो. तरी मानधन मात्र कमीच दिल्या जाते. आर्थिक हातभाराची गरज आहेत. - नीलिमा जाधव, आशासेविका.
घरोघरी जाऊन सर्व्हे करताना आम्हाला अनेक अडचणीचा सामना करत विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. तरीही सर्व कामे आम्ही प्रामाणिकपणे पार पाडतो. - शाईन शेख
फोटो आशासेविका
1) नीलिमा जाधव
2) शाईन शेख