अशोक चव्हाणांकडे भाजपचे मराठवाड्यातील डझनभर विधानसभा मतदारसंघ दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 11:45 AM2024-09-10T11:45:18+5:302024-09-10T11:53:38+5:30
मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी फक्त शिंदे गटाची छत्रपती संभाजीनगर येथील जागा जिंकता आली. इतर सर्व जागा महायुतीला गमवाव्या लागल्या.
छत्रपती संभाजीनगर : माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खा. अशोक चव्हाण यांच्याकडे भाजपने मराठवाड्यातील सुमारे डझनभर विधानसभा मतदारसंघ दत्तक दिल्याची चर्चा असून, त्या अनुषंगाने ते नेमून दिलेल्या मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या टिप्स देत आहेत. गेल्या महिन्यांत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आयएमए हॉलमध्ये बैठक घेतल्यानंतर त्यांनी आज पूर्व मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्रचाराचा मंत्र दिला. पूर्व मतदारसंघातील एका मंगल कार्यालयात त्यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले. यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, हर्षवर्धन कराड, प्रमोद राठोड, आदींची उपस्थिती होती.
शासनाच्या योजना, बूथवर काम करण्याबाबतची पद्धती, मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षण शासनाने दिले आहे. मराठा समाजासाठी आजवर घेतलेले निर्णय जनतेसमोर मांडावेत, असे त्यांनी मेळाव्यात सांगितले. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणे शक्य आहे. तोपर्यंत भाजपला मराठवाड्यातील सुमारे २५ मतदारसंघाची बांधणी मजबूत करायची आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्री गणेश उत्सवानंतर छत्तीसगडची टीम पूर्ण मराठवाड्यात दोन महिन्यांसाठी मुक्कामी येणार आहे. विभागातील काही नेत्यांवर विविध मतदारसंघाची जबाबदारी दिली असून, खा. चव्हाण यांनी पूर्व मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा घेतला. मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी फक्त शिंदे गटाची छत्रपती संभाजीनगर येथील जागा जिंकता आली. इतर सर्व जागा महायुतीला गमवाव्या लागल्या. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ग्राऊंडपर्यंत जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील पूर्व, फुलंब्री आणि गंगापूर मतदारसंघ सध्या भाजपकडे आहेत. कन्नड मतदारसंघ भाजपने महायुतीत मागितला आहे.
अजून काही ठरलेले नाही
भाजपने मराठवाड्यात २५ मतदारसंघात प्रवासी नेते, पदाधिकारी कार्यकर्ते नेमले आहेत. यामुळे भाजप मराठवाड्यात २५ जागा लढविणार काय ? असा प्रश्न पत्रकारांनी खा. चव्हाण यांना केला असता ते म्हणाले, ‘आमचं अजून ठरलेले नाही’ याबाबत समन्वयाने निर्णय होईल. नांदेड लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत प्रश्न केला असता त्यांनी बाेलणे टाळले.