राज्यात सत्ताबदल अटळ, अशोक चव्हाण यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 04:19 IST2018-02-01T04:19:28+5:302018-02-01T04:19:43+5:30
राज्यातील राजकीय खेळपट्टी आमच्यासाठी अनुकूल असून आता कोणते खेळाडू कसे खेळवायचे ते ठरवत आहोत, असे सांगत राज्यात आता सत्ताबदल अटळ आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुधवारी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाºयांशी चर्चा करताना केला.

राज्यात सत्ताबदल अटळ, अशोक चव्हाण यांचा दावा
- नजीर शेख
औरंगाबाद : राज्यातील राजकीय खेळपट्टी आमच्यासाठी अनुकूल असून आता कोणते खेळाडू कसे खेळवायचे ते ठरवत आहोत, असे सांगत राज्यात आता सत्ताबदल अटळ आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी बुधवारी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाºयांशी चर्चा करताना केला.
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरासाठी आलेले चव्हाण यांनी ‘लोकमत भवन’ला भेट दिली. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर खा. चव्हाण यांनी ‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’ आणि ‘लोकमत टाइम्स’च्या संपादकीय सहकाºयांशी चर्चा केली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्यास काँग्रेसची काय तयारी आहे, यावर चव्हाण म्हणाले, गुजरात निवडणुकांनंतर अनेक राज्यांत भाजपाविरोधी वातावरण आहे. त्यामुळे किमान मोदींचा चेहरा पुढे करून एकत्रित निवडणुका जिंकता येतील, असे भाजपाला वाटत आहे. त्यामुळेच ही चर्चा होत आहे. तसे झालेच तर आमचीही पूर्ण तयारी आहे.
समविचारी पक्षांशी युती करण्यावर चव्हाण म्हणाले की, राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी युतीसाठी हात पुढे केला असून, त्याचे मी स्वागत करतो. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये, असे आम्हाला वाटते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय नाही असे म्हटले जाते, या प्रश्नावर खा. चव्हाण म्हणाले, राजकारणात सातत्याने पर्याय निर्माण होत असतात. इंदिराजींनंतर राजीव गांधी यांनी देश सांभाळला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी पक्ष सांभाळला, तर डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपद भूषविले. आता राहुल गांधी हे उत्तम पर्याय आहेत.
दोघांचे स्कील सारखेच
राज्य सरकारला आम्ही ‘फसणवीस सरकार’ अशी उपमा दिली होती. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस निव्वळ घोषणा देत आहेत. दोघांचे फेकण्याचे ‘स्कील’ सारखेच आहे.
शिवसेनेसोबत युती अशक्य
शिवसेना किंवा एमआयएम या पक्षांबरोबर युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट करून खा. चव्हाण म्हणाले, हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही जातीयवादी पक्ष आहेत.