अश्रफ मोतीवाला मारहाण प्रकरणात पोलिसांनी नोंदविले जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:04 AM2021-07-11T04:04:21+5:302021-07-11T04:04:21+5:30
औरंगाबाद : प्रॉपर्टीच्या वादातून अश्रफ मोतीवाला यांना मारहाण केल्याच्या गुन्ह्यात क्रांतीचौक पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. शनिवारी तपास अधिकाऱ्यांनी ...
औरंगाबाद : प्रॉपर्टीच्या वादातून अश्रफ मोतीवाला यांना मारहाण केल्याच्या गुन्ह्यात क्रांतीचौक पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. शनिवारी तपास अधिकाऱ्यांनी अश्रफ मोतीवाला, त्यांची पत्नी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविले. शुक्रवारी घटनास्थळाचा पंचनामा केल्याचे सूत्रांनी सांगितले. समर्थनगर येथील निराला ट्रेड सेंटर येथे ८ जुलै रोजी दुपारी अश्रफ मोतीवाला यांना मारहाण करून त्यांच्या पत्नीसोबत गैरवर्तन केल्याच्या आराेपावरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात अतिक मोतीवाला आणि अश्फाक मोतीवाला यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्याच्या तपासाला वेग देत क्रांतीचौक पोलिसांनी शुक्रवारी घटनास्थळाचा पंचनामा केला. शनिवारी तपास अधिकारी पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तक्रारदार जुवेरिया मोतीवाला, त्यांचे पती अश्रफ, त्या दिवशी घटनास्थळी हजर असलेल्या दोन महिला आणि अन्य एका व्यक्तीचे जबाब नोंदविले.
चौकट
जुवेरिया मोतीवाला यांची तक्रार
दरम्यान, जुवेरिया मोतीवाला यांनी शनिवारी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जात त्यांनी नमूद केले की, ८ जुलै रोजी रात्री क्रांतीचौक ठाण्यात अतिक मोतीवाला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून पतीसह मोतीवालानगर येथील घरी आलो. तेव्हा घराच्या गेटजवळ मुश्ताक पटेल, गौतम आणि सात ते आठ व्यक्ती उभ्या होत्या. त्यांनी शिवीागाळ करून धमकी दिली. तसेच त्यांना आणि त्यांच्या परिवाराला अतिक मोतीवाला यांच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. घराच्या आसपास गुंड प्रवृत्तीचे लोक फिरत असल्याने घराबाहेर पडणे अवघड झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. अतिक यांच्याकडे लायसन्सधारक बंदूक आहे. ही बंदूक ते नेहमी जवळ बाळगतात. यामुळे त्यांची बंदूक जप्त करावी, आमच्या जीविताला धोका असल्याने पोलीस संरक्षण द्यावे, अशी विनंती जुवेरिया यांनी पोलिसांना केली.