पोलिस असल्याचे सांगून कारमध्ये लिफ्ट मागितली; नंतर बंदुकीच्या धाकावर तरुण-तरुणीस लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 07:41 PM2024-09-24T19:41:42+5:302024-09-24T19:41:55+5:30
मैत्रिणीसोबत जेवण्यासाठी गेलेल्या तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार
छत्रपती संभाजीनगर : मैत्रिणीसोबत जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुणाला पोलिस असल्याचे सांगून लिफ्ट मागितली. कारमध्ये बसताच डोक्याला पिस्तूल लावून लुटले. ही घटना शनिवारी रात्री १० वाजता लिंक रोडवर घडली. याप्रकरणी रविवारी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिंधी कॉलनीत राहणारा ध्रुव जैन (२२) शनिवारी रात्री ९ वाजता मैत्रिणीसोबत कारने फिरण्यासाठी गेला होता. त्याच परिसरात जेवण करून तो लिंक रोडने गोलवाडी शिवारातून पैठण रेाडच्या दिशेने जात असताना गाडीच्या समोर अचानक एक तरुण आडवा उभा राहिला. ‘मी पोलिस आहे, मला पुढे गावात सोडून मदत करा’, अशी विनंती त्याने केली. ध्रुवला त्याच्यावर विश्वास बसला. कारच्या मागच्या सीटवर बसल्यावर त्याने माझे गाव पुढे आहे, असे सांगत वळदगाव शिवारात घेऊन गेला. निर्मनुष्य परिसरात जाताच थेट पिस्तूल लावली. या प्रकारामुळे ध्रुव व त्याची मैत्रिणी पुरते घाबरून गेले. दोघांनी घरी जाऊन हा प्रकार सांगितला. त्यानंतर रविवारी ध्रुवने सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. निरीक्षक संग्राम ताटे यांनी गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे तपास करत आहेत.
सोने, रोख रक्कम घेऊन अंधारात पसार
वळदगाव शिवारातून अंधारात नेत त्याने गाडी थांबविण्यास सांगितले. तेथे त्यांच्या अंगावरील दागिन्यांसह रोख रक्कमेची मागणी केली. ध्रुवने त्याच्या हातातील ६ ग्रॅमच्या सोन्याच्या २ अंगठ्या, मैत्रिणीच्या गळ्यातील ८ ग्रॅमची सोनसाखळी व ४ हजार रुपये रोख रक्कम हिसकावून अंधारात पसार झाला.