विभागीय आयुक्तांना ठाणे मनपा आयुक्तपदासाठी विचारणा; महापालिका आयुक्तांनाही हवी बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 02:59 PM2020-06-27T14:59:46+5:302020-06-27T15:10:58+5:30
नवीन अधिकारी आल्यास परिस्थिती समजून घेण्यात जाईल आणखी वेळ
- विकास राऊत
औरंगाबाद : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना ठाणे महापालिका आयुक्तपदासाठी विचारणा करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. याचवेळी महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनीही स्वत:हून आपली बदली करावी, अशी विनंती प्रशासनाकडे केल्याची माहिती आहे.
औरंगाबाद शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही यासंर्भात एक सर्वपक्षीय बैठक घेऊन त्यांच्या बदलीची चर्चा घडवून आणली होती. मात्र मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर अधिकाऱ्यांच्या बदलीचा मुद्दा मागे पडला. मनपा आयुक्त आस्तिककुमार पांण्डेय यांंना आता शहराचा आवाका आलेला आहे. मनपाच्या प्रशासकीय यंत्रणेवर त्यांची आधीपासूनच पकड आहे. शिवाय कोरोनाच्या परिस्थितीत नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली तर शहर व प्रशासनाचे आकलन होण्यास त्या अधिकाऱ्यास कालावधी लागेल. त्यामुळे सरकारलाही येथे नवा आयुक्त नेमण्याची घाई करता येणार नाही. उलट पाण्डेय हेच परिस्थितीशी मुकाबला करु शकतात, असा उच्चपातळीवर सूर आहे.
दुसरीकडे केंद्रेकरांना ठाण्याचे आयुक्त म्हणून विचारणा झाली आहे. कोरोनाच्या परिस्थितीत ठाणे महापालिकेत नवीन अधिकाºयाचा शोध सुरू आहे. ठाण्यात नवीन अधिकारी कोण आणावा असा विचार होत असताना शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून केंद्रेकर यांना ठाणे मनपा आयुक्तपदी विचारणा झाली; परंतु त्यांनी ठाणे येथे बदलीला संमती दिली नसल्याची माहिती आहे. सध्या ते येथेच थांबणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. विभागीय आयुक्त म्हणून केंद्रेकर यांचा कार्यकाळ सव्वा वर्षे पूर्ण झाला आहे. यापूर्वी २०१८ जानेवारीमध्येच त्यांची बदली औरंगाबाद विभागीय आयुक्तपदावर बदली झाली होती; परंतु माजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पूर्ण ताकदीने केंदे्रकर यांची बदली रोखली होती.
मूळचे परभणी जिल्ह्यातील असल्यामुळे मराठवाड्याची जाण असलेले अधिकारी म्हणून केंद्रेकर यांच्याकडे पाहिले जाते. राज्य कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त या पदांसह औरंगाबाद मनपा आयुक्त, बीड जिल्हाधिकारी या पदांची धुरा त्यांनी सांभाळली.कोरोनाच्या महामारीत नांदेड येथील संवदेशनील प्रकरण त्यांनी हाताळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जिल्हाधिकारी उदय चौधरी ग्रामीण भागात गुंतले आहेत, मनपा आयुक्त क्वारंटाईन आहेत. अशा परिस्थितीत औरंगाबादसह मराठवाड्याची जबाबदारी केंद्रेकर यांच्यावर आहे.
अपयशाचा ठपका घेऊ नका...
औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना बदलीची इच्छा व्यक्त करणे म्हणजे अपयशाचा ठपका घेण्याऐवजी येथील परिस्थिती नियंत्रणात आणूनच बदलीचा विचार करा, असा सल्ला पाण्डेय यांना मिळाल्यामुळे त्यांनी बदलीचा मुद्दा बाजूला ठेवल्याचे समजते. पाच दिवसांच्या क्वारंटाईनमधून बाहेर आल्यानंतर ते नव्या जोमाने लागतील, असे दिसते.