६० वर्षांत काय झाले विचारता, पहा महाराष्ट्रातून कोरोना लसींचा जगभरात पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 03:21 PM2021-02-16T15:21:07+5:302021-02-16T15:25:19+5:30

आरोग्य, वैद्यकीय शिक्षणासाठी राज्याची अर्थसंकल्पीय तरतूद ६ ते ७ टक्के होण्यासाठी आग्रहाची मागणी केली जाईल.

Asking what has happened in 60 years, look at the worldwide supply of corona vaccines from Maharashtra | ६० वर्षांत काय झाले विचारता, पहा महाराष्ट्रातून कोरोना लसींचा जगभरात पुरवठा

६० वर्षांत काय झाले विचारता, पहा महाराष्ट्रातून कोरोना लसींचा जगभरात पुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देअधिक डॉक्टर निर्मितीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत जागा वाढविणारपुण्यातून भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात लस पोहोचविण्याचे काम होत आहे.

औरंगाबाद : देशात कुठेही कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार होऊ शकत नाही. उत्पादक क्षमता कुठे नाही, पण ही क्षमता महाराष्ट्रात आहे. पुण्यात लसींंचे उत्पादन होते, हा महाराष्ट्राचा बहुमान आहे. गेल्या ६० ते ७० वर्षांत काय झाले, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. पुण्यातून भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात लस पोहोचविण्याचे काम होत आहे. लस तयार करण्याच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने मान पटकावला आहे, असे म्हणत राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी विरोधकांचे कान टोचले.

औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) शिर्डी संस्थानच्या माध्यमातून प्राप्त एमआरआय यंत्राचे लोकार्पण आणि कोविड योद्धा कर्मचाऱ्यांचा सत्कार सोमवारी अमित देशमुख, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. खा. इम्तियाज जलील, आ. धीरज देशमुख, आ. अंबादास दानवे, आ. अतुल सावे, माजी खा. चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, डॉ. कल्याण काळे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. वर्षा रोटे, डॉ. ज्योती इरावणे-बजाज, डॉ. भारत सोनवणे, डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. अरविंद गायकवाड, प्रकाश मुगदिया, जितेंद्र देहाडे आदींची उपस्थिती होती. प्रातिनिधीक स्वरुपात डॉ. येळीकर, डॉ. भट्टाचार्य, डॉ. इरावणे-बजाज यांचा मान्यवरांच्या हस्ते कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.

अमित देशमुख म्हणाले, आरोग्य, वैद्यकीय शिक्षणासाठी राज्याची अर्थसंकल्पीय तरतूद ६ ते ७ टक्के होण्यासाठी आग्रहाची मागणी केली जाईल. राज्यात प्राेटाॅन थेरपी सेंटर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सध्याच्या पायाभूत सुविधांतच अभ्यासक्रमाच्या जागा वाढवून अधिक डॉक्टर, परिचारिका निर्माण केले जातील. कोविडवर झालेल्या खर्चाचे राज्य सरकारने अवलोकन केले पाहिजे असे ते म्हणाले.

राज्याचे आरोग्य चांगले ठेवेल
आरोग्याला प्राधान्यक्रम देण्यासाठी एकत्र काम केले जाईल. महाविकास आघाडी सरकार राज्याचे आरोग्य चांगले ठेवेल, असे म्हणत सुभाष देसाई यांनीही विरोधकांना टोला लगावला. एमआरआय यंत्राच्या लोकार्पणानंतर सत्कार समारंभास उपस्थित राहणे आ. सावे यांनी टाळले.

एमसीएच विंग घाटीत होईल
घाटीत २०० खाटांचे स्वतंत्र माता व बाल संगोपन केंद्र (एमसीएच विंग) उभारण्यात येईल. त्यासाठी आवश्यक पदांना आगामी १५ दिवसांत मंजुरी मिळेल. घाटीचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे अमित देशमुख म्हणाले.
 

Web Title: Asking what has happened in 60 years, look at the worldwide supply of corona vaccines from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.