इच्छुक उमेदवारांनी केली तलवार म्यान
By | Published: December 2, 2020 04:12 AM2020-12-02T04:12:10+5:302020-12-02T04:12:10+5:30
औरंगाबाद : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२१ मध्ये होईल, असा कयास लावण्यात येत असला तरी उमेदवारांना कसलीच शाश्वती राहिलेली ...
औरंगाबाद : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२१ मध्ये होईल, असा कयास लावण्यात येत असला तरी उमेदवारांना कसलीच शाश्वती राहिलेली नाही. निवडणूक लांबणीवर जाणार असे संकेत मिळू लागल्याने संभाव्य उमेदवारांनी वाॅर्डात पूर्वीसारखा संपर्क ठेवला नाही. कोरोना रुग्णांसाठी दिवस-रात्र मेहनत घेणारे इच्छुक उमेदवार आता गायब झाल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२० मध्ये घेण्यात येणार होती. कोरोनामुळे शासनाकडून आणि आयोगाकडून निवडणूक पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा झाली होती. त्यानंतर निवडणूक आरक्षणाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, सर्वोच्च न्यायालयातील वाद कधी संपुष्टात येईल हेसुद्धा निश्चित नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी इच्छुक असलेल्या किमान दीड ते दोन हजार उमेदवारांनी सध्या तलवार म्यान केली आहे.
औरंगाबादेत मार्च महिन्यात कोरोना आजाराचे रुग्ण सापडत होते. तेव्हा प्रत्येक वाॅर्डात विद्यमान नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार रस्त्यावर उतरून गोरगरीब नागरिकांना आणि रुग्णांना मदत करीत होते. कोरोना रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेणे आणि डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला सुखरूप घरी आणणे ही कामेसुद्धा इच्छुक उमेदवार पार पाडत होते. लॉकडाऊनमध्ये इच्छुक उमेदवारांनी सर्वात जास्त नागरिकांना मदत केली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाची गाडी घेऊन वाॅर्डातील रस्ते निर्जंतुकीकरण करण्याचा विडाच अनेकांनी उचलला होता. महापालिका निवडणूक लांबणार असे वाटू लागल्याने इच्छुक उमेदवारांनी वाॅर्डात येण्याचे टाळणे सुरू केले. वाॅर्डातील कोणत्या नागरिकांना कोरोना झाला आणि ते कधी परत आले हे सुद्धा आता इच्छुकांना माहीत नाही. लग्नकार्य, अंत्यसंस्कार आदी कार्यक्रमांमध्ये इच्छुक उमेदवार सर्वात अगोदर दिसून येत होते. आता हळूहळू ते अंग काढून घेत असल्याचे दिसून येत आहे.
काही उमेदवार अजूनही निवडणूक मैदानात
काही वाॅर्डांमधील विद्यमान नगरसेवक, इच्छुक उमेदवार मैदान सोडायला तयार नाहीत. वाॅर्डामध्ये नित्यनेमाने येणे, नागरिकांच्या भेटीगाठी घेणे असे उपक्रम सुरु आहेत. निवडणुका होतील तेव्हा होतील पण आपण नागरिकांच्या संपर्कात कायम राहिले पाहिजे, या मताचे ते आहेत.
माहिती वकिलाकडे पाठविली
महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत महापालिका प्रशासनाने शपथपत्र दाखल करण्यासाठी वकिलाकडे संपूर्ण माहिती पाठवून दिली आहे. याचिकेची सुनावणी अद्याप बोर्डावर आलेली नाही.
सुमंत मोरे, उपायुक्त महापालिका.