सोयीच्या प्रभागासाठी इच्छुकांची कसरत; महापालिका कच्चा प्रारूप आराखडा तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 08:03 PM2021-10-20T20:03:46+5:302021-10-20T20:05:58+5:30
Aurangabad Municipal Corporation Election: प्रभाग पद्धतीत आपला वॉर्ड आसपासच्या कोणत्या दोन वॉर्डांशी जोडला जाईल, यावर इच्छुक उमेदवार तर्कवितर्क लावत आहेत.
औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने ५ ऑक्टोबर रोजी राज्यातील काही महापालिकांना नवीन प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. औरंगाबाद महापालिकेने ( Aurangabad Municipal Corporation Election ) अद्याप कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्यास सुरुवात केली नाही. मात्र, राजकीय मंडळींनी आतापासूनच सोयीचे प्रभाग येऊ शकतील का, यादृष्टीने जोरदार चाचपणी सुरू केली असून, प्रशासनानेही सावध पवित्रा घेण्यास सुरुवात केली. दिग्गज उमेदवारांनी आपल्या सोयीचा प्रभाग कसा होईल, यासंदर्भात जोरबैठका सुरू केल्या आहेत.
एप्रिल २०१९ मध्ये महापालिकेची मुदत संपली. कोरोना संसर्ग आणि वॉर्ड आरक्षणाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या. कोरोनाचा संसर्ग बराच कमी झाला आहे. त्यातच राज्य शासनाने जुनी वॉर्ड पद्धत रद्द करून प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून चातकाप्रमाणे निवडणुकीची वाट पाहणाऱ्या राजकीय मंडळींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रभाग पद्धतीत आपला वॉर्ड आसपासच्या कोणत्या दोन वॉर्डांशी जोडला जाईल, यावर इच्छुक उमेदवार तर्कवितर्क लावत आहेत. माजी नगरसेवकांनी तर आपल्या स्वप्नातील प्रभागही तयार करून टाकले आहेत. आपल्या सोयीनुसार शेजारचे दोन वॉर्ड जोडून कामालाही सुरुवात केली. प्रभागात आपल्याच पक्षाचे दोन सहकारी उमेदवार कोण असू शकतात, यावरही इच्छुकांनी शिक्कामोर्तब करून टाकले. त्यामुळे पक्षनेत्यांना उमेदवार निवडण्याचा ताणही कमी झाला. काही राजकीय मंडळी संभाव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विविध नागरी प्रश्न घेऊन महापालिका मुख्यालयावर आंदोलनेही करीत आहेत. इच्छुक उमेदवार मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागले असले तरी मनपा प्रशासन अजून ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहे.
कच्चा आराखडा तयार होणार; पण...
महापालिका प्रशासन निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कच्चा प्रभाग आराखडा तयार करणार आहे. मात्र, हे काम कधी होईल हे जाहीर केलेले नाही. कारण, शहरातील दिग्गज उमेदवार, इच्छुक उमेदवार आम्हांला सोयीनुसार प्रभाग तयार करून द्या, अशी गळ घालतील. तेव्हा प्रशासनाला कात्रीत सापडल्यासारखे होईल, त्यामुळे हे काम अत्यंत गोपनीय पद्धतीनेच करण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त केला आहे.
२०१५ मधील पक्षीय बलाबल
शिवसेना- २९
भाजपा- २३
एमआयएम- २४
काँग्रेस- ११
बहुजन समाज पार्टी- ०५
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- ०४
रिपाइं (डेमोक्रॅटीक)- ०२
अपक्ष- १७
एकूण - ११५