मनपाचे माजी सभापती रतनकुमार पंडागळेंसह मुलावर प्राणघातक हल्ला; कारची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 04:38 PM2024-01-10T16:38:46+5:302024-01-10T16:41:19+5:30
या प्रकरणी सहा जणांवर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते महानगरपालिकेचे माजी सभापती रतनकुमार नारायण पंडागळे (७०, रा. जयभीमनगर) यांच्यावर तब्बल १० जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या कारची देखील तोडफोड केली. ९ जानेवारी रोजी हर्सूल शिवारात ही घटना घडली. यात पंडागळे जखमी झाले.
याप्रकरणी प्रकाश बाबुलाल हरणे (३५), किशोर हरणे (३२), रुस्तुम नारायण हरणे (५०), बाबुलाल हरणे (५२), लालचंद ब्रह्मकर (४८) व ताराचंद वाणी (५१) यांच्यावर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंडागळे यांची गेल्या ३०-३५ वर्षांपासून हर्सूल तलावालगत वीटभट्टी असून, त्या जमिनीवरून काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ते गट क्रमांक २४०/१ हर्सूल शिवारातील जमिनीवर जेसीबीने साफसफाई करत होते. प्रकाश हरणे इतर साथीदारांसह तेथे गेला व पंडागळे यांचा मुलगा तसेच जेसीबी चालकाला जमिनीवरून निघून जाण्यासाठी धमकावले.
काही क्षणात आरोपींनी मोठा दगड उचलून पंडागळे यांच्या डोक्यात घातला. त्यानंतर लाठीकाठीने दोघांना मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. जेसीबी चालकाला देखील आरोपींनी मारहाण करून जखमी केले. परत या जागेवर आलात तर तुमचा जीव घेऊ, अशी धमकी देखील दिली. जाताना पंडागळे यांची कार व जेसीबीची तोडफोड केली. याप्रकरणी रात्री उशिरा हर्सूल पाेलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी सांगितले. उपनिरीक्षक कृष्णा घायाळ अधिक तपास करत आहेत.