नुकसानग्रस्त ५० कुटुंबांना मदतीचे धनादेश सुपुर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:02 AM2021-09-07T04:02:06+5:302021-09-07T04:02:06+5:30
कन्नड : तालुक्यातील सात मंडळांत अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करून सोयीसुविधा तात्काळ ...
कन्नड : तालुक्यातील सात मंडळांत अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करून सोयीसुविधा तात्काळ देण्यात याव्यात, त्या दृष्टीने सर्व उपाययोजना करून ग्रामस्थांना मदत देण्याचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कन्नड येथील गजानन हेरिटेजमध्ये झालेल्या आढावा बैठकीत चव्हाण बोलत होते, तर आमदार उदयसिंग राजपूत यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार मदतीचे धनादेश सुपुर्द करण्यात आले.
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, रस्ते, पूल, मोबाइल टॉवर, महावितरण, पाझर तलाव, केटी वेअर, गावलगतचे तलाव याबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चाचा आढावा घेतला. खाजगी शेतजमिनीचे झालेले नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना आदेशित केले. नागद, सायगव्हाण, पिशोर येथील ५० कुटुंबांच्या घरात पावसाचे पाणी शिरून झालेल्या नुकसानीसाठी प्रत्येक कुटुंबास कपडे व भांडी घेण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात पाच हजारांच्या मदतीचे धनादेश सुपुर्द करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांच्यासह सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.