सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार; पालकमंत्री संदीपान भुमरेंची ग्वाही

By विकास राऊत | Published: April 11, 2023 05:28 PM2023-04-11T17:28:14+5:302023-04-11T17:29:05+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८ ते २० मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविलेला असतानाच ७ एप्रिलपासून आजवर पुन्हा १२५० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Assistance will be provided to all affected farmers; Testimony of Guardian Minister Sandipan Bhumren | सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार; पालकमंत्री संदीपान भुमरेंची ग्वाही

सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार; पालकमंत्री संदीपान भुमरेंची ग्वाही

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८ ते २० मार्चदरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठविलेला असतानाच ७ एप्रिलपासून आजवर पुन्हा १२५० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कन्नड तालुक्यातील जेऊर, निपाणी, औराळा,  आणि फुलंब्री तालुक्यातील कान्हेगाव व बाबरा या गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची आज पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करावा असे आदेश देत एकही शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आज सकाळी जेऊर येथील शेतकरी अशोक पवार, निपाणी येथील दत्तात्रय निकम यांच्या शेतातील कांदा पीक, संजय पवार यांच्या बाजरी पिकाच्या तसेच शिवारातील इतर शेतकऱ्यांच्या शेताला भेट देत नुकसानाची पाहणी करून त्यांना धीर दिला. पीकानुसार झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल. ज्वारी, बाजरी, कांदा, आणि इतर फळपिकांचा समावेश मदतीमध्ये होणार आहे. कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांनी संवाद साधताना दिला. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी निपाणी ते औराळा दरम्यानच्या  रस्त्यांची  देखील पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विकास मीना, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, कृषी उपसंचालक प्रकाश देशमुख, तहसीलदार. वरकड यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी या दौऱ्यामध्ये उपस्थित होते.

कन्नड तालुक्यातील निपाणी आणि जेऊर या दोन गावातील शेतीच्या पंचनाम्यासाठी दहा तलाठ्यांची नियुक्ती केली असून लवकरात लवकर शेतीचे पंचनामे पूर्ण होतील, असे यावेळी उपविभागीय  अधिकारी जनार्धन विधाते यांनी सांगितले. त्यानंतर पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी फुलंब्री तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी  आमदार हरिभाऊ बागडे उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे आणि तहसीलदार शीतल राजपूत यांनी तालुक्यातील  नुकसान झालेल्या शेतपिकाची  माहिती तसेच करण्यात येत असलेल्या पंचनाम्यांबाबत पालकमंत्री भुमरे यांना माहिती दिली.

उद्या मुख्यमंत्री येण्याची चर्चा 
विभागात ८ ते २० मार्चदरम्यान झालेल्या गारपीट, अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३,५३५ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी २२ कोटी १७ लाख रुपयांच्या मदतनिधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. ७ एप्रिलपासून आजवर झालेल्या अवकाळी पावसाने जिरायत ४१ हेक्टर्स, बागायत ११९९ हेक्टर्स, तर १० हेक्टर्सवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, बुधवारी, दि. १२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी येतील, अशी चर्चा आहे. 

Web Title: Assistance will be provided to all affected farmers; Testimony of Guardian Minister Sandipan Bhumren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.