विनयभंगाच्या गुन्ह्यातील सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांना जामीन मंज़ूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 08:11 PM2023-01-16T20:11:10+5:302023-01-16T20:11:29+5:30

'एसीपी'चे गाडीत महिलेशी अश्लील चाळे; घरात घुसून पती, सासूला शिवीगाळ

Assistant Commissioner of Police Vishal Dhume granted bail in molestation case | विनयभंगाच्या गुन्ह्यातील सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांना जामीन मंज़ूर

विनयभंगाच्या गुन्ह्यातील सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांना जामीन मंज़ूर

googlenewsNext

औरंगाबाद : महिलेचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. बेदरकर यांनी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सोमवारी जामीन मंजूर केला.

सोमवारी सकाळी सिटी चौक पोलिसांनी ढुमे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला. सुनावणीत सहायक सरकारी वकील शशिकांत इघारे यांनी जामिनास विरोध केला. ढुमे यांच्या वतीने ॲड. गोपाल पांडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आर्णेश कुमार प्रकरणाचा हवाला देत युक्तिवाद केला. सुनावणीअंती न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. ॲड. पांडे यांना ॲड. किरण कुलकर्णी, ॲड. पवन राऊत आणि ॲड. रूपा साखला यांनी सहकार्य केले.

'एसीपी'चे गाडीत महिलेशी अश्लील चाळे; घरात घुसून पती, सासूला शिवीगाळ
सिटीचौक ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार नारळीबाग परिसरातील पीडिता पती, मुलीसह सिडको परिसरातील पाम रेस्टॉरंटमध्ये शनिवारी रात्री पावणेअकरा वाजता जेवण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी सहायक आयुक्त विशाल ढुमे हे मित्रासह जेवणासाठी आलेले होते. पीडितेच्या पतीची ढुमे यांच्यासोबत ओळख होती. तो त्यांना भेटल्यानंतर दोन मित्रांसह ढुमे पीडिता बसलेल्या ठिकाणी भेटायला आले. त्यावेळी ढुमेंनी पीडितेच्या पतीला पोलिस आयुक्तालयासमोर सोडण्याची विनंती केली. ही विनंती त्यांनी मान्य करीत सोडण्यास होकार दिला. रेस्टॉरंटसमोरून मध्यरात्री १ वाजून ४५ वाजता सर्व जण पोलिस आयुक्तालयाकडे निघाले. पीडिता समोरच्या सीटवर मुलीसह बसली होती, तर पती गाडी चालवत होता. ढुमे मागच्या सीटवर बसले होते. त्यांनी मागूनच पीडितेसोबत अश्लील चाळे सुरू केले. तेव्हा पीडितेने त्यास दूर लोटले. पोलिस आयुक्तालय आल्यानंतर ते न उतरता पीडितेच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर पीडितेच्या बेडरूममधील वॉशरूम वापरण्यासाठी आग्रह धरीत होते. तेव्हा त्यांना समजावून सांगत घरी जाण्याची विनंती पीडितेचा पती करीत होता. मात्र, ढुमे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पीडितेच्या सासूबाईही खाली येऊन ढुमे यांना रात्र झाली आहे, तुम्ही घरी जा, अशी विनवणी करीत होत्या. तेव्हा त्याने त्यांच्यासह पतीला शिवीगाळ केली, तसेच जबरदस्तीने दुसऱ्या मजल्यावर गेले. तेव्हा पीडितेच्या सासूने स्वत:ची रूम उघडून देत त्याठिकाणी वॉशरूमसाठी जाण्यास सांगितले. मात्र, त्यांचा आग्रह हा पीडितेच्या बेडरूमचाच होता. ढुमे ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्यामुळे पीडितेच्या पतीने ११२ नंबरला फोन करून पोलिस बोलावून घेतले, तसेच शेजारचे नागरिकही घटनास्थळी धावले. तेव्हा ढुमेंनी पीडितेचा पती, दिराला मारहाण केली. शेवटी ११२ च्या गाडीतील पोलिस कर्मचाऱ्यांनी ढुमेंना गाडीत घेऊन गेले. 

पहाटे साडेपाच वाजता पोलिस आयुक्त ठाण्यात
पीडितेच्या कुटुंबासह परिसरातील नागरिकांनी ढुमेंच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. तेव्हा ठाण्यातून वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांना माहिती देण्यात आली. तेव्हा गिरी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना माहिती समजताच ते पहाटे साडेपाच वाजता ठाण्यात पोहोचले. त्यांनी पीडितेसह कुटुंबाशी संवाद साधला. त्यांना धीर देत गुन्हा नोंदविण्यात येईल, असे स्पष्ट केले. उपायुक्त दीपक गिऱ्हे, शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त अशोक थाेरात यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. गुन्हा नोंदविल्यानंतर उपायुक्त नांदेडकर यांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. पुंडलिकनगरच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी पीडितेसह इतर महिलांचे जबाब नोंदवले.

एसीपीची नियंत्रण कक्षात बदली
पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी एसीपी विशाल ढुमे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली. तसेच घटनेविषयीचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला आहे. ढुमे यांच्या निलंबनाविषयीचा आदेश गृह मंत्रालयस्तरावरच घेण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नगर जिल्ह्यातही गैरवर्तन
एसीपी ढुमे यांची नगर शहरात गडचिरोली येथून पोलिस उपाधीक्षक म्हणून बदली झाल्यानंतर त्यांची आठ महिनेच तेथे काम केले. कामात गैरवर्तन, कर्तव्यात कसुरी व हलगर्जीपणा हे ठपके त्यांच्यावर ठेवून त्यांची औरंगाबाद येथे बदली करण्यात आली होती. ढुमे एकदा कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करीत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आढळले होते. याबाबत त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. दरम्यान, औरंगाबादेतही त्यांनी विविध ठिकाणी गैरवर्तन केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यांच्याविषयी एका महिला अंमलदारानेही पोलिस आयुक्तांकडे तोंडी तक्रार केल्याचे समोर येत आहे. यास दुजोरा काही मिळालेला नाही.

मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल
पीडितेच्या पतीसह दीराला मारहाण करणाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल माध्यमात व्हायरल झाले आहेत. पीडितेचे कुटुंब हात जोडून विनंती करीत असल्याचेही फुटेजमध्ये दिसत आहे.

Web Title: Assistant Commissioner of Police Vishal Dhume granted bail in molestation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.