पोलीस ठाण्यासमोरच सहायक फौजदाराने घेतली लाच; एसीबीने रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 01:55 PM2022-07-06T13:55:39+5:302022-07-06T14:00:01+5:30
अपघातास कारणीभूत टँकर सोडविण्यासाठी टँकरमालकाकडे केली लाचेची मागणी
औरंगाबाद : एका जणाला उडवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात जप्त केेलेला टँकर मुक्त करण्यासाठी चक्क पोलीस ठाण्यासमोरच टँकरमालकाकडून एक हजार रुपये लाच घेताना सहायक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर करण्यात आली.
दिनकर कचरू थोरे (५५, रा. सुधाकरनगर, बायपास) असे अटकेतील सहायक फौजदाराचे नाव आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला होता. टँकरचालकाविरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी टँकर जप्त केला होता. याचा तपास थोरे करीत होते. हा टँकर सोडविण्यासाठी टँकरमालकांनी दोन दिवसापूर्वी थोरे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थोरेंची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हाही तक्रारदाराकडे थोरे यांनी एक हजार रुपये लाच मागितली. थोरेला पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस ठाण्यासमोरच सापळा रचला. यावेळी पोलीस ठाण्याबाहेरच थोरेंनी तक्रारदाराकडून एक हजार रुपये लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात थोरेविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा सौदागर, अंमलदार रवींद्र काळे, राजेंद्र जोशी, विनोद आघाव, चालक चंद्रकांत बागूल यांच्या पथकाने केली.