सहायक उपनिरीक्षक चौधरी यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 08:12 PM2019-01-25T20:12:01+5:302019-01-25T20:15:58+5:30
राष्ट्रपतीचे पोलीस पदक मिळविणारे चौधरी हे मराठवाड्यातील एकमेव पोलीस अधिकारी ठरले आहेत.
औरंगाबाद : पोलीस दलात तब्बल ३७ वर्षे ७ महिने उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील मोटार वाहन शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग किशनलाल चौधरी यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. यावर्षी राष्ट्रपतीचे पोलीस पदक मिळविणारे चौधरी हे मराठवाड्यातील एकमेव पोलीस अधिकारी ठरले आहेत.
अमरसिंग चौधरी हे १९८१ साली जालना येथे पोलीस दलात भरती झाले. त्यानंतर त्यांनी मोटार वाहन शाखा निवडली. जालना आणि हिंगोली येथील राज्य राखीव दलात भरीव कामगिरी केल्यानंतर त्यांची बदली २००५ साली औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयात झाली. २०१४ साली त्यांची बदली औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील मोटार वाहन शाखेत झाली. तेव्हापासून ते सहायक उपनिरीक्षकपदावर काम करीत आहेत. त्यांनी आजपर्यंत ३७ वर्षे ७ महिने उल्लेखनीय सेवा बजावली आहे.
या सेवेची दखल घेऊन २०१७ साली चौधरी यांना पोलीस महासंचालकाचे पदक मिळाले. त्यानंतरही त्यांच्या सेवेचा आलेख उंचावत आहे. त्यांना आजपर्यंत १८५ बक्षीस व पारितोषिके मिळाली आहेत. त्यांच्या सेवेची दखल घेऊन शासनाने त्यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक आज जाहीर केले. राष्ट्रपतीचे पोलीस पदक मिळविणारे चौधरी हे मराठवाड्यातील यंदाचे एकमेव अधिकारी आहेत. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभात पोलीस आयुक्त कार्यालय येथे मुख्य अतिथींच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.