सहायक परिवहन अधिकारी जायभाये लाचेच्या जाळ्यात
By Admin | Published: January 22, 2016 12:13 AM2016-01-22T00:13:24+5:302016-01-22T00:13:24+5:30
औरंगाबाद : स्कूल बसच्या परवान्यासाठी सात हजाराची लाच मागणाऱ्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) सुधीर जायभाये (४२, रा. प्लॉट क्र.३९, महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी, एन-७) यांना
औरंगाबाद : स्कूल बसच्या परवान्यासाठी सात हजाराची लाच मागणाऱ्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) सुधीर जायभाये (४२, रा. प्लॉट क्र.३९, महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी, एन-७) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.२१) अटक केली. जायभाये यांच्या वतीने लाच स्वीकारणारा एजंट उपेंद्र ऊर्फ बाबू रॉय (३३, रा, गरमपाणी) यालाही जेरबंद करण्यात आले.
तक्रारदाराच्या पाच बसेस एका शाळेतील विद्यार्थी वाहतूक करतात. वाहतूक परवाना नसणाऱ्या या बसेसचा स्कूल बसमध्ये समावेश करण्याची त्यांची मागणी होती, तसेच शाळेच्या मालकीच्या सात बसेसच्या परवान्यांचेही नूतनीकरण करायचे होते. तक्रारदाराने या कामांची कागदपत्रे तयार केली. १८ जानेवारी रोजी जायभाये यांची कार्यालयात भेट घेऊन आपली कामे करण्याची गळ घातली.
या कामांसाठीचे ११,३५० रुपयांच्या शासकीय शुल्काचा भरणा करण्याचे जायभाये यांनी सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने शासकीय शुल्काचा भरणा केला. त्यानंतर पुन्हा जायभाये यांची भेट घेतली असता, वरील कामे करून देण्यासाठी दहा हजाराच्या लाचेची मागणी त्यांनी केली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी ‘आरटीओ’ कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून सात हजार रुपयाची लाच घेताच उपेंद्रला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर जायभाये यांना अटक करण्यात आली.