असोसिएट सीईटी रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना होणार फायदा
By Admin | Published: March 13, 2016 02:45 PM2016-03-13T14:45:38+5:302016-03-13T14:49:16+5:30
परभणी : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षेसाठी यापूर्वी होणारी असोसिएट सीईटी ही परीक्षा रद्द करुन एकच वैद्यकीय, अभियांत्रिकी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला
परभणी : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी परीक्षेसाठी यापूर्वी होणारी असोसिएट सीईटी ही परीक्षा रद्द करुन एकच वैद्यकीय, अभियांत्रिकी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असून या निर्णयाचा राज्यातील गोरगरीब आणि मागासवर्गीय विभागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी यापूर्वी शिक्षण विभागाच्या वतीने सीईटी परीक्षा घेतली जात होती. त्यानंतर खाजगी आणि विना अनुदानित महाविद्यालयामधील वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेशाच्या जागा भरण्यासाठी असोसिएट सीईटी घेण्यात येत होती. सुमारे ६०० जागा असोसिएट सीईटीमार्फत भरल्या जात. यात विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसाही वाया जात होता. या निर्णयात शासनाने बदल केला असून एकाच सीईटीमार्फत सर्व महाविद्यालयातील वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश गुणवत्ता यादीनुसार होणार आहेत. त्यामुळे या निर्णयाचा राज्यभरातील गोरगरीब विद्यार्थ्यांबरोबरच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती डॉ.हुलसुरे फाऊंडेशनचे डॉ.मारोती हुलसुरे यांनी दिली. १ मार्चपासून आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. ती २२ मार्चपर्यंत चालणार आहे. ६६६.ेिी१.ङ्म१ॅ. या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना भरता येणार आहेत. २५ ते ३० एप्रिल या काळात अॅडमिट कार्ड मिळणार आहे. (प्रतिनिधी)
अशी असेल परीक्षा पद्धत
यावर्षी प्रथमच वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठी एकच सीईटी परीक्षा ७ मे रोजी होत आहे. या परीक्षेविषयी येथील डॉ.मारोती हुलसुरे यांनी सांगितले, यावर्षी सीईटी परीक्षा बारावी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित होणार आहे. दीडशे गुणांची ही परीक्षा असेल. त्यात भौतिकशास्त्र ५०, रसायनशास्त्र ५० आणि जीवशास्त्र १०० गुणांचे पेपर असतील. तर अभियांत्रिकीसाठी भौतिक, रसायन प्रत्येकी ५० गुण आणि गणिताचे १०० असे १५० गुणांसाठी ही परीक्षा होईल. यावर्षी परीक्षेचे वैशिष्ट्ये म्हणजे या वैद्यकीय सीईटी परीक्षेतून शासकीय म्युन्सिपल कार्पोरेशन, प्रायेव्हेट एडेड, अनएडेड आणि मायनॉरिटी हेल्थ सायन्स इन्स्टिट्युशन, कॉलेज यासाठी ही परीक्षा बंधनकारक राहणार आहे. तसेच याच परीक्षेच्या गुणवत्ता यादीतून व्हेटरनरी सायन्स आणि अॅनिमल अॅण्ड फिशरी या अभ्यासक्रमासाठीही प्रवेश दिले जाणार आहेत.