जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:04 AM2021-09-13T04:04:29+5:302021-09-13T04:04:29+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी ...
औरंगाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी करीत जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन नुकसानग्रस्तांना रविवारी दिले. सत्तार यांनी कन्नड, वैजापूर, खुलताबाद व गंगापूर तालुक्यातील गावांतील शेताच्या बांधावर भेट दिली.
जिल्ह्यातील बऱ्याच मंडळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणी साचले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मूग, उडीद, सोयाबीन,तूर, कापूस या पिकांना मोठा फटका बसला असून फळपिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. जनावरे, रस्ते, पूल तसेच घरांचीही पडझड झाली असून महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणांनी तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश त्यांनी दिले. आ. रमेश बोरनारे, माजी आ. नितीन पाटील, सभापती किशोर बलांडे, अविनाश गलांडे, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, गंगापूरचे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध गावातील सरपंच व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.