ज्योतिषी अजूनही मंगळाच्या फेऱ्यात
By Admin | Published: December 29, 2014 01:04 AM2014-12-29T01:04:23+5:302014-12-29T01:07:33+5:30
औरंगाबाद : ज्योतिषी अजूनही मंगळ-मंगळी पत्रिकेच्या परीक्षेतच गुंतलेले आहेत.
औरंगाबाद : विज्ञानाने मंगळ यान गाठून झेंडा रोवला. ज्योतिषी अजूनही मंगळ-मंगळी पत्रिकेच्या परीक्षेतच गुंतलेले आहेत. ही परीक्षा घेण्याऐवजी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे मार्गदर्शन २१ व्या शतकामध्ये ज्योतिषी व शास्त्राकडून झाले पाहिजे, असे मत बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
१० लेखकांच्या पुस्तकांमधील १० प्रकरणे चोरून लिहून पुस्तके लिहिणारे दुसऱ्यांचे भविष्य काय सांगणार. कालसर्प, षडाष्टक योगाची भीती घालण्यापेक्षा सकारात्मक मार्गदर्शक करणे महत्त्वाचे आहे. ज्योतिषशास्त्रावर पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांची नावेदेखील ज्योतिषांना माहिती नसतात. अशा मंडळींच्या हाती लोकांचे भविष्य कसे असू शकेल, असा सवालही त्यांनी केला.
ज्योतिषशास्त्र ७० टक्के विवाह जुळविण्यासाठीच वापरले जात आहे. या पलीकडेही अभ्यासाच्या मर्यादा वाढविल्या पाहिजेत. २१ व्या शतकात हे शास्त्र म्हणून पुढे येण्यासाठी उपासना करावी लागेल. ज्योतिषांना रंजकतेने भविष्य सांगता आले पाहिजे, तरच शास्त्राचा सकारात्मक प्रचार होईल. या शास्त्राचे मूळ कायम ठेवून रचना बदलावी लागेल. किती दिवस जुन्या कल्पनेत अडकणार, शास्त्राच्या नियमांत बदल करणे गरजेचे आहे. २०० हून अधिक शिक्षणाची दालने, १०७ नोकरी व्यवसायांचे मार्ग आहेत. तरीही भविष्य सांगणारे, पाहणारे इंजिनिअर, डॉक्टर या शिक्षणयोगावरच भर देतात. नवग्रह, देवदैवतांची पूजा करायची की शांती करायची हा स्वत:ला प्रश्न पडला पाहिजे. बहुजन समाज आजही पत्रिका दाखविण्यासाठी ब्राह्मणाकडे गेल्याचे सांगतो, ज्योतिषाकडे गेल्याचे सांगत नाही. हे शास्त्र सर्वव्यापी झाले पाहिजे, विद्यापीठात हे शास्त्र
जोवर जात नाही, तोवर विकास होणार नाही.