पोरगं पाचवीला, तरी झोपेत करते अंथरूण ओलं; पालक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 07:45 PM2024-07-29T19:45:01+5:302024-07-29T19:45:20+5:30
मुले जर अंथरूण ओलं करीत असतील, तर त्याविषयी त्यांना नकारात्मक बोलू नये.
छत्रपती संभाजीनगर : मुलांच्या अंथरूण ओलं करण्याच्या सवयीमुळं पालक त्रस्त होऊन जातात. ठराविक वयानंतरही मुलांची ही सवय कायम राहत असेल, तर वेळीच लक्ष देऊन मुलांची ही सवयी मोडायला हवी, असे तज्ज्ञांनी म्हटले.
या वयापर्यंत मुलं अंथरूण ओलं करतात
मुले ही प्रारंभी लघवीवर दिवसा नियंत्रण ठेवण्याचे शिकतात. त्यानंतर रात्री लघवीवर नियंत्रण ठेवण्याचे शिकतात. लघवीवर रात्री नियंत्रण ठेवण्याचे जी मुले शिकत नाहीत, ते अंथरूण ओलं करतात. त्याबरोबर इतर कारणांनीही अंथरूण ओलं करतात. अंथरूण ओलं करण्याची ही सवय ६ ते १५ वर्षे वयोगटांतील मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. अंथरूण ओलं करण्याची त्यांची ही सवय वेळीच मोडली नाही, तर त्याचे आजारांत रूपांतर होऊ शकते.
म्हणून अंथरूण ओलं
भीती, निराशा : चिंता, मानसिक समस्या आणि भीती किंवा नैराश्यामुळे मुले रात्री झोपेत अंथरूण ओलं करतात.
लघवीची पिशवी लहान, नियंत्रण नसणे : लघवीची पिशवी लहान असणे, नियंत्रण नसणे यांसह काही आजारांमुळेही मुले अंथरूण ओलं करतात.
हे उपाय करून बघा
- झोपण्यापूर्वी कोणतेही पेय देऊ नका.
- झोपण्यापूर्वी मुलांना बाथरूमला जाण्याची सवय लावावी.
- झोपल्यानंतर २ तासांनी मुलांना उठवा आणि त्यांना बाथरूमला जायला सांगा.
- झोपेच्या आधी कमी पाणी पिणे.
- रात्री अलार्म लावणे.
- ऑलिव्ह ऑइलचे सेवन करणे.
- ऑलिव्ह ऑइलने पोटावर मालिश घेणे.
- ग्लासभर पाण्यात चमचाभर आवळा पावडर घेणे.
नकारात्मक बोलू नये
मुले जर अंथरूण ओलं करीत असतील, तर त्याविषयी त्यांना नकारात्मक बोलू नये. मुले आधी अंथरूण ओलं करीत नव्हते आणि अचानक अंथरूण ओलं करू लागले, तर त्यामागे नैराश्य, काही भावनिक कारण आहे का, हे शोधले पाहिजे.
- डाॅ. प्रशांत जाधव, बालरोगतज्ज्ञ
७ वर्षांनंतरही समस्या, तर लक्ष द्या
लहान मुलांमध्ये ७ वर्षांपर्यंत ब्लॅडर नियंत्रण नैसर्गिकरीत्या आले नसते. ही समस्या त्यामुळे दिसून येते, पण ७ वर्षांनंतर जर ही समस्या आढळली, तर त्याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे आहे. काही शारीरिक आणि मानसिक कारणे असतात. ती हाताळली पाहिजे. मानसिक आघातसुद्धा या समस्येला जन्म देतात. त्याच्या उपचार करणे आवश्यक आहे.
- डाॅ. अमोल देशमुख, मनोविकारतज्ज्ञ.