नारेगाव येथील ४० वर्षांपासून पडून ३ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया, आणखी ७ मे. टन बाकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 12:16 IST2025-03-01T12:15:12+5:302025-03-01T12:16:14+5:30
छत्रपती संभाजीनगरात नारेगाव येथे दहा लाख मेट्रिक टन तर चिकलठाणा, हर्सूल व पडेगाव येथे किमान पाच लाख मेट्रिक टन कचरा पडून आहे

नारेगाव येथील ४० वर्षांपासून पडून ३ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया, आणखी ७ मे. टन बाकी
छत्रपती संभाजीनगर : नारेगाव येथे मागील ४० वर्षांपासून टाकण्यात येणारा कचराप्रक्रिया न करता तसाच पडून होता. या कचऱ्यावर ६८ कोटी रुपये खर्च करून प्रक्रिया करण्यात येत आहे. आतापर्यंत तब्बल ३ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली. या कचऱ्यातील प्लॅस्टिकला सिमेंट कंपन्यांमध्ये पाठविले जात आहे. कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताला शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे.
नारेगाव येथील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी म्हणून शासनाने मनपाला ६६ कोटींचा निधी दिला. त्यानुसार महापालिकेने जीएनआय कंपनीला अन्य एका कंपनीसोबत जाईंटव्हेंचरमध्ये काम सोपविले. त्यासाठी सुमारे ६८ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. दि. ३० सप्टेंबर २०२४ पासून बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. एप्रिलअखेरपर्यंत येथील संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आदेश उपायुक्त विजय पाटील यांनी दिले. ४५० व ३५० मेट्रिक टनाच्या दोन मशीन नारेगाव येथे बसविण्यात आल्या.
हर्सूल, पडेगाव आणि चिकलठाणा येथेही कचराप्रक्रिया केंद्राच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. या कचऱ्यावरही प्रक्रिया केली जाणार आहे. अगोदर पडेगाव येथील कचरा कसा कमी होईल, यादृष्टीने एक मशीन बसवून काम करण्यात येत आहे. लवकरच हर्सूल, चिकलठाण्यात हे काम सुरु होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
१५ लाख टन कचरा पडून
शासनाने महापालिकेला नारेगाव येथील दहा लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ६८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. चिकलठाणा व हर्सूल, पडेगाव येथे किमान पाच लाख मेट्रिक टन कचरा पडून आहे. त्यामुळे शासनाला आणखी पाच लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निधी मिळावा, अशी विनंती केली जाणार आहे.
कचऱ्यापासून सोने
कचऱ्यातून निघणाऱ्या प्लॅस्टिकला सिमेंट कंपन्यांकडून मोठी मागणी आहे. राज्यातील चंद्रपूर, कर्नाटक, छत्तीसगड मधील दुर्ग व रायपूर येथे प्लॅस्टिक कचरा पाठविला जात आहे. कचऱ्यापासून तयार हाेणाऱ्या खताला शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे.