वयाच्या चौदाव्या वर्षीच मुलं प्रेमप्रकरणातून सोडताहेत घरे; पालक, पोलिसांच्या चिंतेत वाढ

By सुमित डोळे | Published: July 6, 2023 01:28 PM2023-07-06T13:28:16+5:302023-07-06T13:29:36+5:30

छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा महिन्यांमध्ये १३४ मुले गेली पळून; कुटुंबात विसंवाद, सोशल मीडियाचा वाढता वापर मुख्य कारण, वाळूज औद्योगिक वसाहतीत मुली, महिला पळून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक

At the age of fourteen, children leave home for love affairs; Increase in concern of parents, police | वयाच्या चौदाव्या वर्षीच मुलं प्रेमप्रकरणातून सोडताहेत घरे; पालक, पोलिसांच्या चिंतेत वाढ

वयाच्या चौदाव्या वर्षीच मुलं प्रेमप्रकरणातून सोडताहेत घरे; पालक, पोलिसांच्या चिंतेत वाढ

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: १६ वर्षांची साक्षी (नाव बदलले आहे)चे आई वडील दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असायचे. शाळेनंतर तिचा बहुतांश वेळ सोशल मीडियावर जायचा. त्यातून तिची भुवनेश्वरच्या मुलासोबत ओळख झाली आणि साक्षीने अवघ्या महिनाभराच्या ओळखीवर घर सोडून भुवनेश्वर गाठले. गुजरातच्या अहमदाबादहून अशाच पंधरा वर्षांच्या मुलीने एकतर्फी प्रेमातून थेट छत्रपती संभाजीनगर गाठत पोलिसांना प्रियकर शोधून देण्याची मागणी केली. अशा एक-दोन नाही तर गेल्या साडेतीन वर्षांमध्ये तब्बल ५०१ बालकांनी घर सोडले. यात ८० टक्के मुली असून त्यातही प्रेमप्रकरणातून घर सोडण्याचे वय १४ व्या वर्षांपर्यंत खाली आले आहे. या साडेतीन वर्षांच्या तुलनेत २०२३ जूनपर्यंतच १३४ बालकांनी घर सोडले. त्यात ९५ मुली असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या अहवालातून समोर आली आहे.

काबाडकष्ट करून वाढवणाऱ्या आई-वडिलांपेक्षा सध्या मुला-मुलींना आभासी जगातील मित्र, मैत्रिणी, प्रियकर अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहेत. यात सर्वाधिक प्रमाण मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे आहे. त्यांना पळवून नेणारे मोठे असतात. परंतु, कमी वयातील असमज, आकर्षण, वेब सिरीज, मोबाइल व सोशल मीडियाच्या अति वापरामुळे मुलांमधील सहनशीलता संपत चालली आहे, असे स्पष्ट निरीक्षण पाेलिस नोंदवतात. आई, वडील नोकरीत व्यस्त असतात. कुटुंबात संवाद साधण्यासाठी कोणीही नसल्याने अल्पवयीन मुली निरनिराळ्या आमिषांना बळी पडतात. मित्राकडून, प्रियकराकडून ती पोकळी भरली जात असल्याचा भास त्यांना होतो व क्रमाने घर सोडण्याच्या निर्णयापर्यंत त्या येऊन थांबतात. या सगळ्यात पालकांच्या पदरी मात्र मन:स्ताप येतो. अल्पवयीन असल्याने मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. कायद्याने देखील त्यांचे लग्न बेकायदेशीर ठरते आणि पुढील अनेक महिने दोन्ही कुटुंबांच्या मागे कायद्याचा ससेमिरा लागतो. हे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांकडून आता शाळाशाळांमध्ये जाऊन प्रबोधन सुरू आहे.

तीन वर्षांत २०२३च्या सहा महिन्यात सर्वाधिक
पोलिसांच्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये २०२३च्या जानेवारी ते जूनमध्ये सर्वाधिक मुले पळून गेली. यात १३४ एकूण मुलांमध्ये ३९ मुले तर ९५ मुली आहेत. अल्पवयीन असल्याने यात भादंवि ३६३ नुसार त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास दिला जातो.
२०२०             २०२१             २०२२ २०२३ (जूनपर्यंत)
दाखल/उघड दाखल/उघड दाखल/उघड दाखल/उघड
९७/८६             ११२/१०८ १५८/१४४ १३४/८९

वाळुज औद्योगिकमध्ये प्रमाण अधिक
मुली, महिला पळून जाण्याचे प्रमाण वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये सर्वाधिक आहे. २०२३ जुन पर्यंत ३२ मुली पळून गेल्याची नोंद आहे. त्या खालोखाल सिडको, पुंडलिकनगर व मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील परिसर आहेत.

२४ मुलांचा शोध सुरू
२०२३ मध्ये पळून गेलेल्या मुलांमध्ये १३४ पैकी अद्यापही २४ मुला, मुलींचा शोध सुरू आहे. यात २० मुली तर चार मुलांचा समावेश आहे.

यांना शोधणे मोठे आव्हान
पाेलिस ठाण्याच्या पातळीवर चार महिन्यांमध्ये अशा मुलांचा शोध लागला नाही तर त्याचा विशेष व वेगाने तपास होण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे (एएचटियू) दिला जातो. २०२१ मध्ये त्यांनी प्राप्त १७ गुन्ह्यांपैकी १४ बालकांचा तर २०२२ मध्ये ११ बालकांमध्ये ९ बालकांचा यशस्वी शोध लावून कुटुंबाच्या स्वाधीन केले. पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त अपर्णा गिते यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवाजी तावरे, सहायक निरीक्षक सुषमा पवार, सहायक फौजदार ईसाक पठाण, हेड कॉन्स्टेबल डी. डी. खरे, संताेष त्रिभुवन, बाबासाहेब राठोड, हिरा चिंचोलकर व अमृता काबलीये यांचे पथक सातत्याने अशा बालकांचा शोध घेण्यासाठी कष्ट घेत आहेत.

नंतर चुकीची जाणीव होते
मुलींचे घर सोडण्याचे प्रमाण तुलनेने वाढले आहे. यात प्रेमप्रकरणातून पळून जातात. कायद्याची जाण नसते. परंतु पालकांपेक्षा प्रियकर महत्त्वाचा वाटतो. यात १४व्या वर्षापर्यंत हे प्रमाण आले आहे. पालकांनी मुलांशी योग्य व सातत्याने संवाद वाढवावा, संवेदनशील विषयांवर आई किंवा वडिलांनी खुलेपणाने बोलावे, समजून सांगितल्यास असे प्रकार टाळता येतील. सुषमा पवार, सहायक निरीक्षक, एएचटीयू विभाग.

Web Title: At the age of fourteen, children leave home for love affairs; Increase in concern of parents, police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.