छत्रपती संभाजीनगराच्या प्रवेशद्वारात १०८ फूट उंच ध्वजस्तंभावर फडकला भव्य राष्ट्रध्वज
By प्रभुदास पाटोळे | Published: August 25, 2023 07:53 PM2023-08-25T19:53:24+5:302023-08-25T19:54:13+5:30
‘फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया’चा शहराच्या वैभवात भर घालणारा उपक्रम
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या प्रवेशद्वारात नगर नाका येथील विजय स्मारकालगत ‘फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया’द्वारे उभारण्यात आलेल्या १०८ फूट उंच ध्वजस्तंभाचे उद्घाटन वीरपत्नी कमल भगवान खरात आणि आर्मी वाइव्ह्ज वेल्फेअर असोसिएशन (आवा) च्या अध्यक्ष अनिता सुनील नारायणन यांच्या हस्ते ३६ फूट लांब आणि २४ फूट रुंद ध्वज फडकावून झाले. ध्वजस्तंभाचा पाया छत्रपती संभाजीनगर फर्स्टने बांधून दिला आहे.
तत्पूर्वी कोनशिलेचे अनावरण फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेजर जनरल अश्विन कोहली आणि स्टेशन कमांडर ब्रिगेडियर सुनील नारायणन यांच्या हस्ते झाले. ‘फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया’द्वारे उभारण्यात आलेला देशातील हा ११५ वा ध्वजस्तंभ असल्याचे कोहली यांनी सांगितले. बुधवारी आर्मी वाइव्ह्ज वेल्फेअर असोसिएशन डे (आवा) असल्यामुळे उद्घाटनासाठी हा दिवस निवडल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाला छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे, हेमंत कोल्हे, मानसिंग पवार आदी प्रतिष्ठित नागरिक, वीर पत्नी, वीर माता, भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष एम.जी. बिल्लेवार, सचिव शेषराव आराक, कोषाध्यक्ष (पीएसआय) भाऊलाल नागरे, उपाध्यक्ष सुदाम सोळंके, प्रवीण जाधव, श्रीमंत जाधव, जावळे, मगरे, सुभेदार गोगटे, कॅप्टन सोनोने, सुभेदार कदम, हवालदार भास्कर आराक आदींची उपस्थिती होती.
वर्षभर राष्ट्रध्वज फडकवण्याचे सुधारित नियम
देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ५७ वर्षांपर्यंत वर्षभर राष्ट्रध्वज फडकवण्याची नागरिकांना मुभा नव्हती. फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक खासदार नवीन जिंदाल यांनी यासाठी लढा दिला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक भारतीयाला वर्षभर तिरंगा राष्ट्रध्वज फडकावण्याचा अधिकार दिला. दिवसा आणि रात्रीसुद्धा राष्ट्रध्वज फडकावता येतो. मात्र, सार्वजनिक ठिकाणी ध्वजावर प्रकाश (लाइट)असावा. झेंडा खादी अथवा पॉलिएस्टरचा चालतो. झेंडा मळका, फाटका नसावा. जुना झेंडा एकांतात, आदरपूर्वक, सन्मानाने पूर्णपणे नष्ट करावा लागतो. कोणतीही व्यक्ती कंबरेच्या वर वस्त्रांवर झेंडा लावू शकते. राष्ट्रध्वज उभा (व्हर्टिकल) अथवा क्षितिज समांतर (हॉरिझॉन्टल) लावता येतो, मात्र त्याचा जमिनीला स्पर्श होऊ देऊ नये, असे सुधारित नियम असल्याचे कोहली यांनी सांगितले.