Atal Bihari Vajpayee : ‘हम तो जागे हैं, हम कहाँ सोये हैं’; अटलबिहारी वाजपेयींचा औरंगाबादशी होता विशेष स्नेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 04:02 PM2018-08-17T16:02:04+5:302018-08-17T16:04:10+5:30

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा औरंगाबादशी वेगळा स्नेह होता. जनसंघापासून ते देशाच्या विदेशमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात वाजपेयी अनेक वेळा या ऐतिहासिक शहरात येऊन गेले.

Atal Bihari Vajpayee: 'We are awake, where are we sleeping'; Atal Bihari Vajpayee's special affection with Aurangabad | Atal Bihari Vajpayee : ‘हम तो जागे हैं, हम कहाँ सोये हैं’; अटलबिहारी वाजपेयींचा औरंगाबादशी होता विशेष स्नेह

Atal Bihari Vajpayee : ‘हम तो जागे हैं, हम कहाँ सोये हैं’; अटलबिहारी वाजपेयींचा औरंगाबादशी होता विशेष स्नेह

googlenewsNext

औरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा औरंगाबादशी वेगळा स्नेह होता. जनसंघापासून ते देशाच्या विदेशमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात वाजपेयी अनेक वेळा या ऐतिहासिक शहरात येऊन गेले. वाजपेयींच्या प्रमुख उपस्थितीत बैठका आणि जनसभाही झाल्या. अनेकदा त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसवर मुक्काम केला. त्यावेळेस रात्रीच्या छोटेखानी मैफलीत ते संसदेमधील किस्से, कविता सर्वांना सांगत असत. शहरातील माजी आ. शालिग्राम बसैये, तसेच सुधीर देशपांडे (आबासाहेब) यांच्या घरीही ते येऊन गेले होते. या आठवणी खास लोकमतच्या वाचकांसाठी दयाराम बसैये व आबासाहेब देशपांडे यांनी सांगितल्या आहेत. 

‘ओ भाजपके लाल, तुम अब तो जागो’ 
दयाराम बसैैये यांनी सांगितले की, स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाबमध्ये आतंकवाद वाढला होता. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी औरंगाबादेत आले होते. आमचे बंधू त्यावेळेस भाजपचे शहराध्यक्ष होते. पंजाबमधील आतंकवादामुळे चिडून मी कविता लिहिली होती आणि आमचे मोठे बंधू शालिग्राम बसैये यांना मी ती कविता अटलजींना दाखविण्याची विनंती केली. सुभेदारी गेस्ट हाऊसवर बंधूंनी अटलजींशी माझी भेट करून दिली. अटलजी म्हणाले की, दयाराम आपने कविता की है बहुत अच्छे, तुम्हने ही कविता की है ना. मी म्हणालो हो. लगेच अटलजीने कविता लिहिलेला कागद माझ्या हातातून घेतला व म्हणाले ‘अब बोलो कविता’. कविता मुखपाठ होती. ‘ओ भाजप के लाल, तुम अब तो जागो’ ही कविता मी म्हटली. लगेच अटलजी म्हणाले की ‘हम तो जागे है, हम कहाँ सोये है’ या हजरजबाबी उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हास्य पिकले. 

ते म्हणाले, येथे स्वयंसेवकांची संख्या कमी...
दयाराम बसैये यांनी सांगितले की, अटलजी जेव्हा विदेशमंत्री होते. त्यावेळेस शहरात कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. सुभेदारी गेस्ट हाऊसवर मुक्काम करून सकाळी चिकलठाणा विमानतळावर ते जाण्यासाठी निघाले. विमान येण्यास वेळ असल्याने त्यांनी लेबर कॉलनी येथील राणाप्रताप प्रभात शाखेत हजेरी लावली. त्यावेळेस तेथील छोटे मैदान नागरिकांनी खचून भरून गेले होते. त्यावेळेस अटलजींचे ऊर्जेने भरलेले बौद्धिक पार पडले. त्यावेळेस उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. ते पाहून अटलजी लगेच म्हणाले की, या ठिकाणी स्वयंसेवकांची संख्या खूप कमी आहे. बिगरस्वयंसेवक जास्त आहेत. कारण, स्वयंसेवक शाखेत कधीच टाळ्या वाजवत नाहीत.

कार्यकर्ते विसरून जातात म्हणून...
विदेशमंत्री असताना अटलजी विमानाने सकाळी शहरात आले. नेहमीप्रमाणे त्यांची व्यवस्था सुभेदारी गेस्ट हाऊसवर करण्यात आली होती. दयाराम बसैये म्हणाले की, त्यादिवशी सकाळी अटलजी सुभेदारी गेस्ट हाऊसवर पोहोचल्यावर फ्रेश होऊन आले आणि शालिग्राम बसैये यांना म्हणाले की, मेरा कल का हवाईजहाज का तिकीट किधर है. त्यावेळेस बंधूंनी लगेच तिकीट त्यांच्याकडे सुपूर्द केले. मी म्हटले की, ‘अटलजी असे का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, ‘कार्यकर्ते कार्यक्रमाच्या आधी व पश्चात नियोजनात असतात. जेव्हा विमानाने जायची वेळ येते तेव्हा तिकीट कोणत्या कार्यकर्त्याकडे दिले हे माहीत नसते. ज्याच्याकडे  असते तोही व्यस्त असतो. आपली अडचण होऊ नये, म्हणून मी आधीच तिकीट मागून घेत असतो. 

बदले नही अटलजी 
जगन्नाथ बसैये यांनी सांगितले की, भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी शहरात आले होते. त्यावेळेस दयाराम बसैये यांनी हिंदीतून मराठीत अनुवाद केलेले ‘वंदले अटलजी’ हे पुस्तक मोठे बंधू शालिग्राम बसैये यांनी अडवाणींना दिले. त्यांनी दिल्लीमध्ये ते पुस्तक अटलजींकडे सुपूर्द केले. ‘वंदले अटलजी’ हे वाचून लगेच अटलजी अडवाणींना म्हणाले, ‘बदले नही अटलजी, मै तो वही हू, वंदले अटलजी,’ असे म्हणत त्यांनी कोटी केली. त्यावेळेस अडवाणीही मोठ्याने हसले. 

रात्रीच्या वेळी रंगणारी मैफल
दयाराम बसैये यांनी सांगितले की, जेव्हा अटलजी औरंगाबादेत येत तेव्हा तेव्हा सुभेदारी गेस्ट हाऊस येथे त्यांचा मुक्काम असे. मग आमचे मोठे बंधू शालिग्राम बसैये, ओमप्रकाश बसैये, लहान बंधू जगन्नाथ बसैये, तसेच शहरातील जनसंघाचे व नंतर भाजपचे कार्यकर्ते असे काही जण यांची रात्री ८.३० वाजेनंतर मैफल रंगत असे. अटलजी म्हणायचे, ‘बसैय्ये बंधू आपने मेरा दूध और च्यवनप्राश लाया क्या.’ गरमागरम दूध पिल्यानंतर व च्यवनप्राश खाल्ल्यानंतर अटलजी संसदेतील तत्कालीन दिग्गज नेत्यांचे भाषण व तेथील गमती-जमती त्यांच्या स्टाईलमध्ये सांगत असत. अखेरीस स्वरचित काही ओळीही ते ऐकवत असत. अटलजींचा असा सहवास आम्हाला काही वेळा लाभला. 

Web Title: Atal Bihari Vajpayee: 'We are awake, where are we sleeping'; Atal Bihari Vajpayee's special affection with Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.