४ हजार नोकऱ्या देणारा २ हजार कोटींचा ‘अथर’ प्रकल्प ‘डीएमआयसी’मध्ये करणार गुंतवणूक
By बापू सोळुंके | Published: June 27, 2024 07:32 PM2024-06-27T19:32:23+5:302024-06-27T19:32:45+5:30
‘लोकमत’च्या बातमीवर शिक्कामोर्तब : बिडकीन ‘डीएमआयसी’मध्ये ‘अथर एनर्जी’चा प्रकल्प येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १८ जून रोजी प्रकाशित केले होते.
छत्रपती संभाजीनगर : इलेक्ट्रिकल बाइक उत्पादन करणारी देशातील सर्वांत मोठ्या“अथर एनर्जी’ कंपनीने छत्रपती संभाजीनगरच्या ‘ऑरिक सिटी’मध्ये दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा करणारी पोस्ट ‘एक्स’ या त्यांच्या समाजमाध्यमावर शेअर केली. अथर कंपनी बिडकीन ‘डीएमआयसी’मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर आणि बॅटरी संच उत्पादन करणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे चार हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने येथील उद्योगजगतात उत्साहाचे वातावरण आहे.
बिडकीन ‘डीएमआयसी’मध्ये ‘अथर एनर्जी’चा प्रकल्प येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १८ जून रोजी प्रकाशित केले होते. या बातमीवर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. येथील वाळूज औद्योगिक वसाहतीमधील ऑटोमोबाइलवर आधारित उद्योग जगभरातील नामांकित वाहन उद्योगांना स्पेअर पार्ट्सचा पुरवठा करतात. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक व्हेंडर साखळी येथे विकसित झालेली असल्याने वाहन उद्योगांसाठी येथील इंडस्ट्री पूरक मानली जाते. ‘ऑरिक सिटी’च्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत बिडकीन आणि शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात सुमारे दहा हजार एकर जमीन उपलब्ध आहे. उद्योगाला आवश्यक त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेली ही देशातील एकमेव औद्योगिक वसाहत आहे. येथे अँकर प्रकल्प यावा, यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक उद्योजकांची संघटना असलेल्या ‘सीएमआयएए’चे पदाधिकारी सतत प्रयत्न करीत होते. या प्रयत्नांना आता यश आले आहे. बंगळुरुस्थित अथर एनर्जी या इलेक्ट्रिक बाइक उत्पादन करणाऱ्या कंपनीने बिडकीन डीएमआयसीमध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अथर एनर्जी’चे सहसंस्थापक स्वप्नील जैन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर याविषयी घोषणा त्यांच्या ट्विटर हँडलवर याबाबतची पोस्ट शेअर केली.
पाठपुराव्याला यश
बिडकीन डीएमआयसीमध्ये अँकर प्रकल्प यावा, यासाठी सीएमआयएचे माजी अध्यक्ष नितीन गुप्ता आणि विद्यमान पदाधिकारी दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. आमचे शिष्टमंडळ ‘अथर’च्या संस्थापकांना अनेकदा भेटले. एनर्जी परिषदेसाठी अथरचे सहसंस्थापक स्वप्निल जैन यांना आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा त्यांना छत्रपती संभाजीनगरचे वैशिष्ट्य आणि डीएमआयसी दाखविली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अथर ग्रुपच्या वरिष्ठांसोबत बैठका झाल्या, यावेळी आम्ही उपस्थित होतो. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, तसेच मंत्री अतुल सावे यांचे विशेष सहकार्य लाभले.
४,००० जणांना रोजगार
प्रकल्पात सुमारे ४,००० जणांना रोजगार मिळेल. यासोबतच उद्योग जगतातील पुरवठादारांनाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोठा व्यवसाय मिळणार आहे.
२०२६ पर्यंत एक लाख स्कूटर निर्मितीचे उद्दिष्ट
२०२६ पर्यंत एक लाख इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीचे उद्दिष्ट आहे. यासोबतच बॅटरी संचाचे उत्पादनही होणार आहे. या प्रकल्पामुळे स्टार्ट अप आणि उत्पादन इकोसीस्टिम अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे.