खुल्या प्रवर्गातील ‘शिक्षकोत्सुक’ बेरोजगारांमध्ये संतापाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:03 PM2019-03-04T23:03:00+5:302019-03-04T23:03:33+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करण्याचे खुल्या प्रवर्गातील युवकांचे स्वप्न भंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील ३४ पैकी ३३ जि.प.मध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा दाखविण्यात आली नाही. खुल्या प्रवर्गातील बेरोजगारांसाठी शिक्षक भरतीच्या जागा वाढविण्यात याव्यात, यासाठी डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशनतर्फे ७ मार्चपासून पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी दिली.
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करण्याचे खुल्या प्रवर्गातील युवकांचे स्वप्न भंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील ३४ पैकी ३३ जि.प.मध्ये खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा दाखविण्यात आली नाही. खुल्या प्रवर्गातील बेरोजगारांसाठी शिक्षक भरतीच्या जागा वाढविण्यात याव्यात, यासाठी डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशनतर्फे ७ मार्चपासून पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर यांनी दिली.
जि.प.त शेवटची शिक्षक भरती २०१० मध्ये झाली. यानंतर नुकतीच पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. राज्यात जि.प. महापालिका, नगरपालिका आणि खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये दहा हजार शिक्षकांची पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली. जि.प.मध्ये शिक्षक भरतीसाठीची प्रक्रिया सुरू केली असता, खुल्या प्रवर्गातील जागा शून्यावर पोहोचल्यामुळे काही संघटनांनी बिंदू नामावलीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. या आरोपांची निवेदने शिक्षणमंत्र्यांकडे पाठविण्यात आली. यानुसार शिक्षण विभागाने ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षित प्रवर्गासाठी पदे उपलब्ध होत आहेत अशा जिल्हा परिषदांमध्ये भरतीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व पदांवर भरती करण्यात यावी, उर्वरित जिल्हा परिषदांमध्ये सद्य:स्थितीत केवळ अनुशेषाच्या आरक्षित प्रवर्गातील भरतीसाठी उपलब्ध पदांपैकी ५० टक्के पदांवर भरती करण्यात यावी. ज्या जिल्हा परिषदांमध्ये केवळ आरक्षित प्रवर्गातील ५० टक्के पदांवर भरती करण्यात येईल, त्या जि.प.मध्ये बिंदू नामावली पुन्हा तपासून अद्ययावत करण्याबाबत सूचना देण्यात येईल, असे स्पष्ट केले. या निर्णयानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेमधून शिक्षक भरतीसाठी जाहिरात काढण्यात येत आहे. यात राज्यातील ३४ जिल्हा परिषदांपैकी केवळ एकाच जि.प.मध्ये खुल्या प्रवर्गासाठी १३२ जागा भरण्यात येणार आहेत. उर्वरित ३३ जि.प. मध्ये एकही शिक्षकाचे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार नाही. जागा वाढविण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा बरोजगारांच्या संघटनेतर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे संतोष मगर यांनी स्पष्ट केले.
‘एसईबीसी’ प्रवर्गात राज्यात ३६२ जागा
नव्याने आरक्षण जाहीर झालेल्या मराठा समाजाच्या ‘सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग’ला (एसईबीसी) १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार जि.प.च्या जाहिरातींमध्ये या आरक्षणाचा समावेश आहे. मात्र, राज्यातील ३४ जि.प. पैकी २४ मध्ये एसईबीसी प्रवर्गाला शून्य जागा दाखविण्यात आल्या आहेत. उर्वरित १० जि.प.मध्ये ३६२ जागा उपलब्ध असल्याची माहिती संतोष मगर यांनी दिली. यातही बिंदू नामावलींमुळे गोंधळ उडाला असल्याचे त्यांनी सांगितले.