‘पेट’ धारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:08+5:302021-06-16T04:06:08+5:30
औरंगाबाद : पीएच.डी. प्रवेशासाठी लिंक खुली करण्यात आल्यापासून ‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थी मार्गदर्शकांची खुशामत करण्यासाठी त्यांचे उंबरे झिजवत असल्याचा प्रकार ...
औरंगाबाद : पीएच.डी. प्रवेशासाठी लिंक खुली करण्यात आल्यापासून ‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थी मार्गदर्शकांची खुशामत करण्यासाठी त्यांचे उंबरे झिजवत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान, पीएच.डी.साठी ऑनलाइन प्रवेशाची नोंदणी करताना संशोधन सारांश पत्रिका (सिनॉप्सिस) किंवा गाईड सूचविण्याची गरज नाही, अशी सूचना विद्यापीठाने वेबसाइटवर दिलेली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून अनेक विद्यार्थी मार्गदर्शक प्राध्यापकांची भेट घेऊन पीएच.डी.साठी विषय कोणता निवडावा, सारांश पत्रिका कशी तयार करावी तसेच संशोधनासाठी तुम्हीच मार्गदर्शक व्हा, अशी खुशामत करताना दिसत आहेत.
मार्चमध्ये ‘पेट’च्या दुसऱ्या परीक्षेत सुमारे ४ हजार विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तुलनेने पीएच.डी.साठी मोजक्याच जागा रिक्त असून ५७ वयोगटापुढील गाईडकडे संशोधनासाठी विद्यार्थी न देण्याचा विद्यापीठाचा नियम आहे. त्यामुळे गाईडची संख्याही कमी झाली आहे. दुसरीकडे, ‘पेट’पासून सूट असलेले नेट, सेट, गेट, एमएफील विद्यार्थीदेखील पीएच.डी.साठी रांगेत आहेत. त्यामुळे ‘पेट’धारक विद्यार्थ्यांनी प्रवेशाअगोदरच गाईड मिळविण्यासाठी कसरत सुरू केली आहे.
यासंदर्भात एका अधिष्ठातांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करताना ‘सिनॉप्सिस’ किंवा गाईड नमूद करण्याची गरज नाही. त्या त्या विषयांच्या रिक्त जागेनुसार विद्यार्थ्यांची गुणवत्तेवर निवड होईल. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना तोंडी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यावेळी ‘सिनॉप्सिस’ सादर करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘सिनॉप्सिस’ तयार करणे किंवा गाईड मिळविण्यासाठी आपला वेळ व शक्ती उगीच खर्च करू नये.
चौकट...
३० जूनपर्यंत ऑनलाइन नोंदणीची मुदत
‘पेट’ उत्तीर्ण तसेच नेट, सेट, गेट, एम.फिल.धारकांना ७ ते ३० जूनदरम्यान पीएच.डी. प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत विद्यापीठात प्रत्यक्ष ‘हार्ड कॉपी’ जमा करावी लागणार आहे.