पाच आरोपींविरुद्धचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा उच्च न्यायालयात रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:51 PM2021-06-29T16:51:12+5:302021-06-29T16:53:00+5:30
गुन्हा, तसेच आरोपीविरुद्ध दाखल केलेले दोषारोप पत्र रद्द करावे, यासाठी आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता.
औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस स्टेशनअंतर्गत दाखल ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ५ आरोपींवर दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.व्ही.के. जाधव आणि न्या.श्रीकांत कुलकर्णी यांनी रद्द केला.
लक्ष्मण गवळी यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्याचे वडील बन्सी गवळी यांनी २० सप्टेंबर, २०१० रोजी खासगी सावकार सय्यद रहीम सय्यद महेबूब याच्याकडून घरखर्च व शेती विकासासाठी ३ लाख रुपये घेतले होते. या व्यवहाराच्या विश्वासापोटी बन्सी गवळी यांनी त्यांच्या नावावरील ३ एकर जमिनीचे खरेदीखत सय्यद रहीम याच्या नावे केले होते. बन्सी गवळी याने सय्यद रहीम यास एकूण रुपये ४ लाख ५० हजार रुपये परत केले होते, परंतु तरीही खरेदीदार सय्यद रहीम हा शेतीची नोंदणी (रजिस्ट्री) बन्सींच्या नावे करीत नव्हता. सय्यद रहीम व त्याच्या इतर ४ साथीदारांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या वडिलांनी एक महिन्यापासून अन्न व पाण्याचा त्याग केला होता. ते १६ फेब्रुवारी, २०२० रोजी मरण पावले होते.
या फिर्यादीवरून ५ आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हा, तसेच आरोपीविरुद्ध दाखल केलेले दोषारोप पत्र रद्द करावे, यासाठी आरोपींनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता. प्रथमदर्शनी आरोपींविरुद्ध कोणताही गुन्हा दिसून येत नाही. आरोपींना विक्री केलेली जमीन परत मिळविण्यासाठी फिर्यादीने सदर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व आरोपींचे आपसातील वाद दिवाणी स्वरूपाचे असल्याचे मत नोंदवत खंडपीठाने गुन्हा रद्द केला. आरोपीतर्फे ॲड.सुदर्शन जी. साळुंके यांनी बाजू मांडली, तर सरकारतर्फे ॲड.वट्टमवार यांनी काम पाहिले.