यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीवर अत्याचार; तरुणावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:06 AM2021-02-06T04:06:26+5:302021-02-06T04:06:26+5:30
जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, शहरातील विवाहित तरुणीचे पतीसोबत पटत नसल्याने, ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली येथे ...
जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, शहरातील विवाहित तरुणीचे पतीसोबत पटत नसल्याने, ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली येथे गतवर्षी राहत होती. २९ मार्च, २०२० रोजी आरोपी कार्तिकसोबत इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर तिची ओळख झाली. या ओळखीतून दोघांचे मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. तेव्हा तिने ती पतीपासून घटस्फोट घेत असल्याचे तर त्याने तो अविवाहित असल्याचे परस्परांना सांगितले. लॉकडाऊन लागल्याने ती औरंगाबादला परतली, तेव्हा आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला आणि १२ मे, २०२० पासून २६ जानेवारी, २०२१ पर्यंत तिच्यावर त्याच्या घराच्या परिसरात कारमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केले. गेल्या काही महिन्यांपासून ती त्याच्याकडे लग्नाची मागणी करू लागली असता, तो वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत. पीडितेला त्याच्यावर संशय आल्यावर ती थेट त्याच्या घरी गेली असता, कार्तिकचे मे, २०२० मध्ये लग्न झाल्याचे तिला समजले. यामुळे तिने त्याला जाब विचारला असता, त्याने तिला तिच्या घरी जाऊन मारहाण केली आणि तिच्या दुचाकीची तोडफोड केली. यानंतर, पीडितेने पोलिसांत धाव घेतली. जवाहरनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री पीडितेची तक्रार नोंदवून घेत, आरोपी कार्तिकविरुद्ध बलात्कार करणे, मारहाण करणे, फसवणूक करणे आदी कलमांनुसार गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे या तपास करत आहेत.