राजकीय नेत्यांवर नव्हे, अपप्रवृत्तीवर हल्ला, ठाले पाटील यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 08:23 AM2021-06-27T08:23:28+5:302021-06-27T08:24:00+5:30
ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक ‘अक्षययात्रा’च्या अध्यक्षीयमध्ये संमेलनातील अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. या अपप्रवृत्तींवर उदाहरणांसह प्रहार केला आहे. त्यात कोणत्याही राजकीय नेत्यांवर टीका केलेली नाही. ज्यांना मराठी भाषा समजते, त्यांना महामंडळ आणि माझी भूमिका काय आहे हे ‘अक्षरयात्रा’चे अध्यक्षीय वाचल्यास समजेल, असे स्पष्टीकरण अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच अध्यक्षीय मनोगतातील प्रत्येक शब्दावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक ‘अक्षययात्रा’च्या अध्यक्षीयमध्ये संमेलनातील अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली. नाशिकच्या नियोजित साहित्य संमेलनाविषयीच्या घटना उदाहरणासह उजेडात आणल्या आहेत. यातून संमेलनात सुधारणा व्हावी, हीच अपेक्षा आहे. संमेलन लोकांचे झाले पाहिजे. साहित्यप्रेमींचा पैसा नसेल तर संमेलन निव्वळ राजकीय नेत्यांचे किंवा सरकारचेच होईल. साहित्य महामंडळाला हेच नको आहे. मागील वर्षी उस्मानाबाद येथे झालेले संमेलन कोणत्याही राजकीय मदतीशिवाय आणि अवघ्या तीन जणांनी मेहनत घेत कमी पैशांत यशस्वी करून दाखविले आहे. हीच अपेक्षा निमंत्रक संस्थेकडे संमेलन देताना व्यक्त केली होती. ती त्यांनाही मान्य होती; मात्र संमेलनाचा स्वागताध्यक्ष निवडण्याचा असलेल्या अधिकाराचा वापर करून निधी संकलनाचे काम स्वागताध्यक्षावर सोपविल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महामंडळाचे कार्यवाह डॉ.दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांची उपस्थिती होती.
चर्चेतून दिशा मिळावी
दोन्ही बाजूेची मते मला मान्य आहेत. त्यावर चर्चा व्हावी, दिशा मिळावी. साहित्य संमेलन हे निव्वळ साहित्यासाठी व्हावे, हीच अपेक्षा आहे. महामंडळाचा कार्यकाळ आणखी एक वर्ष असणार आहे. तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहून योग्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडून महामंडळ गेल्यानंतर बोलून, भूमिका घेऊन उपयोग होणार नाही. ती आताच घेतली पाहिजे. त्यानुसार ती घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.