पुन्हा एका साधूवर जीवघेणा हल्ला; श्रीराम टेकडीवरील महाराजांना गावकऱ्यांकडून जबर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 03:08 PM2020-12-26T15:08:32+5:302020-12-26T15:12:08+5:30
Attack on a Sadhu again in Aurangabad : दिंडीतील गावकरी व टेकडीवरील नागा साधू महंत गणेशगिरी महाराज (पंच दशनाम जुना आखाडा, उत्तराखंड) यांच्यात बाचाबाची होऊन प्रकरण चिघळले
पैठण (औरंगाबाद ) : पैठण तालुक्यातील मेहरबान तांडा येथील श्रीराम टेकडीवरील नागा साधू महंत गणेशपुरी महाराज यांच्यावर निलजगाव येथून दिंडी घेऊन गेलेल्या शेकडो गावकऱ्यांनी शुक्रवारी लाठ्या काठ्यासह तुफान दगडफेक करीत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महाराज गंभीर झालेल्या महाराजांना भक्तांनी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, बीडकीन पोलिस ठाण्यात या गंभीर घटनेची अद्याप कसलीच नोंद घेण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून गावकरी आणि भक्तांकडून एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
शुक्रवारी मोक्षदा एकादशीच्या मुहूर्तावर निलजगाव ( ता. पैठण ) येथील गावकरी दर्शनासाठी मेहरबान नाईक तांडा येथील श्रीराम टेकडीवर दर्शनासाठी गेले होते. या दरम्यान दिंडीतील गावकरी व टेकडीवरील नागा साधू महंत गणेशगिरी महाराज (पंच दशनाम जुना आखाडा, उत्तराखंड) यांच्यात बाचाबाची होऊन प्रकरण चिघळले व गावकरी आक्रमक झाले. यानंतर महंत गणेशपुरी महाराज दोन्ही हातात तलवार घेऊन गावकऱ्यासमोर उभे राहिले. महाराजांनी तलवार काढल्यानंतर गावकऱ्यांनी महाराजांवर दुरूनच तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत महाराज गंभीर जखमी झाले. यानंतर काही जेष्ठ नागरिकांनी समजूत घालून गावकऱ्यांना माघारी पाठवून गंभीर जखमी महाराजांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात हलवले.
महाराजांनी अरेरावी केली; गावकऱ्यांनी सांगितले कारणे
गावकऱ्यांच्या म्हण्यानुसार, शुक्रवारी मोक्षदा एकादशी असल्याने निलजगाव येथून दर्शनासाठी महिला व पुरूषांची दिंडी श्रीराम टेकडीवर गेली होती. दिंडीतील महिला टेकडीवर फराळ करण्यासाठी बसल्या असता महाराजांच्या मालकीची एक गाय या महिलांमध्ये घुसली. महिलांना त्रास होऊ नये म्हणून एका गावकऱ्याने तेथून गाय हुसकावून लावली. गायीला हुसकावून लावल्याचा महाराजांना राग आला. त्यांनी गाय हुसकावणाऱ्या गावकऱ्यास दोन काठ्या मारल्या. याचा जाब विचारताच महाराज अरेरावी करत तलवार घेऊन धाऊन आले. यानंतर गावकरी घाबरले व त्यांनी दगडफेक केली असे गावकरी सांगत आहेत.
वर्षभरापासून गावकऱ्यांचा त्रास; महाराजांच्या भक्तांचा आरोप
तर या उलट महाराजांनी श्रीराम टेकडीचा केलेला विकास व टेकडीला आलेले तीर्थक्षेत्राचे स्वरूप लक्षात घेता निलजगाव येथील गावकरी गेल्या वर्षभरापासून कुरापती काढून महाराजांना दमदाटी करत आहेत. यातूनच महाराजांवर शुक्रवारी गावकऱ्यांनी हल्ला केला असे महंत गणेशगीरी महाराजांच्या शिष्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या प्रकरणाबाबत बीडकीन पोलीस ठाणे अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. एवढे मोठे प्रकरण होऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुध्दा ठाण्यात या बाबत कसलीच नोंद घेण्यात आलेली नव्हती. पोलीसांच्या या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.