वाळूमाफियांचा महसूलच्या पथकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:10 AM2018-12-24T00:10:49+5:302018-12-24T00:11:23+5:30
शिवना नदीपात्रातील घटना : नायब तहसीलदारांसह तीन कर्मचारी गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरु
वैजापूर : शिवना नदीच्या पात्रात सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळूमाफियांसह परिसरातील १०० ते १२५ लोकांच्या जमावाने दगडांनी हल्ला चढविला. या घटनेत नायब तहसीलदारांसह तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
रविवारी सायंकाळी लाखनी मांडकी शिवारातील शिवना नदीच्या पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. ही तस्करी थांबविण्यासाठी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने शिवना नदी गाठली. यावेळी चार ते पाच ट्रकमध्ये वाळू भरणा सुरू होता. पण कर्मचाºयांना काही समजण्याच्या आतच तस्करांनी व परिसरातील १०० ते १२५ लोकांच्या जमावाने दगडगोटे मारण्यास सुरुवात केली. यात नायब तहसीलदार भालेराव, तलाठी म्हस्के, लिपिक जाधव व सचिन गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्या हातावर आणि डोक्यात दगडांचे घाव बसले असून, त्यांच्या नाका-तोंडातून रक्त येत होते. गंभीर अवस्थेत नायब तहसीलदार भालेराव यांना अगोदर लासूर व इतर तीन कर्मचाºयांना देवगाव रंगारी येथे प्राथमिक उपचार करून नंतर वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. रात्री उशिरापर्यंत देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूहोते.
वाळू तस्करांची दादागिरी वाढली
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफियांची दादागिरी वाढली आहे. अवैध वाळू उपसा करण्याबरोबरच वाहतूक केली जाते. याला प्रतिबंध करण्यासाठी वैजापूर, शिऊर पोलिसांसह महसूलच्या पथकाकडून वारंवार कारवाया केल्या जातात. रविवारीही लाखनी- मांडकी परिसरातील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसील पथकाला मिळाली. त्यामुळे
पथक शिवना नदीपात्रात गेले आणि हा राडा झाला. पथकाने वाळूमाफियांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. उपविभागीय अधिकारी संदीपान सानप पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पथकाला धीर देत कारवाईचे आश्वासन दिले. या घटनेनंतर शिऊर व देवगाव पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे.
दोषींवर कडक कारवाई
हल्लेखोर शंभर ते सव्वाशे जण होते. या सर्वांनी महसूलच्या पथकावर दगडाने हल्ला चढविला. हल्लेखोर कोण आहेत, याची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी सांगितले.