थरारक! काट्यात अडकलेल्या जखमी कोब्रावर पक्षी, मुंग्यांचा हल्ला; अखेर असे वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:29 PM2023-03-16T12:29:56+5:302023-03-16T12:31:18+5:30
जेव्हा सर्वात विषारी कोब्रा साप अडकतो बाभळीच्या काट्यात...
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: तालुक्यातील पालोद धरणाजवळ बाभळीच्या काट्यात पडल्याने कोब्रा साप जखमी झाला. अंगात काटे टोचल्याने रक्तबंबाळ अवस्थेतील कोब्रावर मग टिटवी पक्षी चोच मारू लागले. तसेच जखमेला मुंग्या लागल्याने कोब्रा कासावीस झाला. अशा अवस्थेतील कोब्राची सुटका सर्पमित्र अजिनाथ महाराज यांनी केली. त्यानंतर पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी उपचारकरून कोब्राचे प्राण वाचवले. ही थरार घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता झाली.
सिल्लोड तालुक्यातील पालोद धरणाच्या बाजूस बाभळी आहेत. येथे एक कोब्रा साप बाभळीच्या काट्यात पडून जखमी झाला. त्यानंतर पक्ष्यांनी हल्ला चढवत कोब्राला आणखी जखमी केले. रक्त निघत असल्याने मुंग्या देखील तुटून पडल्या. हे दृश्य पाहून सर्पमित्र अजिनाथ महाराज यांनी कोब्रास तेथून बाहेर काढले. शरीरावर अनेक ठिकाणी काटे रुतल्याने कोब्रा रक्तबंबाळ झाला होता. त्यामुळे उपचारासाठी डॉ. संतोष पाटील यांना कळवली. डॉ. पाटील यांनी काटे काढून जखमेवर उपचार केले. काही काळ निगराणीत ठेवल्यानंतर कोब्रास जंगलात सोडण्यात आले.
कात टाकण्यासाठी झाडावर गेला असावा
सहा फुटी नर कोब्रा सुस्त वाटत होता. कदाचित तो कात टाकण्यासाठी अरुंद जागा शोधत होता. यातूनच तो आधी एका झाडाच्या जाळीत अडकला. तेथे पक्षी हल्ला करत असल्याने खाली पडून बाभळीच्या काट्यात पडून आणखी जखमी झाला. काट्यातून बाहेर काढल्यानंतर त्यास छिद्र असलेल्या बरणीत ठेवण्यात आले. त्यानंतर त्याच्या शिरीरातून ३ काटे काढण्यात आले. उपचारानंतर एकातासात कोब्रा बरा झाला.