नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:18 IST2025-04-19T13:18:12+5:302025-04-19T13:18:49+5:30
नवीन पाणीपुरवठा योजनेतील सर्वात मोठे काम जीव्हीपीआर कंपनीकडे आहे.

नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर हल्ले
छत्रपती संभाजीनगर : शहराला लवकरात लवकर पाणी मिळावे म्हणून काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कालपर्यंत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. गुरुवारी चक्क कंपनीच्या कार्यालयात घुसून एका व्यक्तीने व्यवस्थापकाला मारहाण केली. या प्रकरणी रात्री उशिरा उस्मानपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेच्या निषेधार्थ कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नवीन पाणीपुरवठा योजनेतील सर्वात मोठे काम जीव्हीपीआर कंपनीकडे आहे. शहराला लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. कंपनीला येणाऱ्या अडचणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोडविल्या जात आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, जीव्हीपीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांना ‘लक्ष्य’ केले जात आहे. मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यावर हल्ला झाला. त्यांना पोलिस बंदोबस्त देण्यात आला. त्यानंतर जीव्हीपीआर कंपनीचे मॅनेजर महेंद्र गोगुलोथु यांना फोनवर जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या.
९ एप्रिल रोजी त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी त्यांच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात सचिन घोडके नामक इसम शिरला. त्याने गोगुलोथु यांना पाण्याची बाटली छातीत मारली. चापट बुक्क्यांनी मारहाण केली. पण या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात पुन्हा केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. शुक्रवारी कंपनीतील बाहेरगावाहून आलेले अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ झाले. त्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला. या घटनेची माहिती मिळताच विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी धाव घेतली. अधिकारी, कर्मचाऱ्यांची समजूत घालून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ती मान्य केली.
समांतरसारखे हकालपट्टीचे प्रयत्न
समांतर जलवाहिनीची ज्या पद्धतीने हकालपट्टी करण्यात आली. त्याच पद्धतीने जीव्हीपीआर कंपनीची हकालपट्टी करण्यासाठी काही मंडळी सरसावली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.