अडते, व्यापाऱ्यांनी घेतला बदला !
By Admin | Published: February 4, 2017 12:40 AM2017-02-04T00:40:13+5:302017-02-04T00:40:52+5:30
लातूर : हमीभावाप्रमाणे तुरीची खरेदी करण्यावरुन लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत तिढा वाढला आहे़
लातूर : हमीभावाप्रमाणे तुरीची खरेदी करण्यावरुन लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत तिढा वाढला आहे़ आडते, खरेदीदारांनी शुक्रवारी तुरीसह अन्य कुठल्याही शेतमालाचा सौदाच पुकारला नाही़ परिणामी, शेतमाल घेऊन आलेल्या जवळपास पाच हजार शेतकऱ्यांची अडचण झाली़ त्यामुळे बाजार समितीतील जवळपास २० कोटींची उलाढाल ठप्प राहिली़
यंदा चांगले पर्जन्यमान झाल्याने तूर, हरभऱ्याचा उतारा चांगला मिळत आहे़ तूर, हरभऱ्याच्या राशी झालेले शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत़ लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाला चांगला दर मिळतो, हा अनुभव अनेक शेतकऱ्यांना असल्याने जिल्ह्याबरोबरच सीमावर्ती भागातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात़
सध्या बाजार समितीत तूर, सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे़ दरम्यान, गुरुवारी बाजार समितीने हमीभावापेक्षा तुरीची खरेदी- विक्री करु नये, असे बजावल्याने अडते, खरेदीदारांनी तुरीचा सौदाच पुकारला नाही़ शुक्रवारी जवळपास ५ हजार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला होता़ परंतु, अडते आणि खरेदीदारांनी तूर वगळता अन्य शेतमालाचा सौदा करणे शक्य होत नसल्याचे सांगून कुठल्याही शेतमालाचा सौदाच पुकारला नाही़ परिणामी, शेतमाल आणलेल्या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली़ त्यामुळे बाजार समितीतील उलाढाल ठप्प झाली़ (प्रतिनिधी)