अट्टल चोरटा सिडको पोलिसांच्या जाळ्यात, दोन मंगळसूत्र चोरीसह चार गुन्हे केल्याची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:04 AM2021-07-15T04:04:26+5:302021-07-15T04:04:26+5:30
सिडकोत सहा ते सात महिन्यांपूर्वी दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या होत्या. हे गुन्हे वैभव इंगोलेने केल्याची माहिती ...
सिडकोत सहा ते सात महिन्यांपूर्वी दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याच्या घटना घडल्या होत्या. हे गुन्हे वैभव इंगोलेने केल्याची माहिती खबऱ्याने सिडको पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला दिली. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. मंगळवारी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली.
सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना देत होता. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने चार गुन्ह्यांची कबुली दिली. गतवर्षी एका महिलेच्या गळ्यातील दीड लाखाची सोन्याची पोत हिसकावून नेल्याचे त्याने सांगितले. ही तीन तोळ्याची सोन्याची पोत त्याने पोलिसांच्या हवाली केली. यावर्षीही जानेवारी महिन्यात एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचे सांगितले.
एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरे फोडून कॅमेरा आणि अन्य सोन्या-चांदीचे अलंकार चोरल्याचे सांगितले. एक किमती कॅमेराही त्याने पोलिसांच्या स्वाधीन केला. या चोरट्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, बाळासाहेब आहेर, हवालदार सुभाष शेवाळे, नरसिंग पवार, दिनेश बन, सुरेश भिसे आणि सोनवणे यांनी केली.