जामीन मिळताच अट्टल चोरटा पुन्हा सक्रीय; २४ तासातच घरफोडीच्या गुन्ह्यात झाला गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 07:15 PM2020-07-04T19:15:56+5:302020-07-04T19:17:57+5:30
चोरट्याने गुंह्याची कबुली देत अल्पवयीन साथीदारासोबत ही घरफोडी केल्याचे सांगितले
औरंगाबाद: चोरी घरफोडीच्या गुंह्यात न्यायालयाने जामीनवर सोडल्यानंतर अवघ्या २४ तासांत सातारा परिसरात घरफोडी करून लाखाची सोन्याचांदीचे दागिने पळविणाऱ्या अट्टल चोरट्याला सातारा पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून चोरीचा सर्व ऐवज पोलिसांनी जप्त केला.
आकाश उर्फ गयब्या ( रा . छोटा मुरलीधरनगर )असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे . याविषयी पोलिसांनी सांगितले की सातारा परिसरातील रहिवासी प्रियंका पांडूरंग कुदळे या २ रोजी रात्री सहपरिवार बेड रुममध्ये झोपल्या होत्या . चोरट्यानी त्यांच्या घराचे दाराची कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला . हॉल मध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाट उघडून त्यांनी त्यातील सोन्याची एक तोळ्याची पोत , ५ ग्रॅमचे झुंबर , ३ ग्रॅम चे मंगळसूत्र, चांदीचे वाळे , चांदीचे पैंजण असा सुमारे ८० हजाराचा ऐवज चोरुन नेला होता . दुसऱ्या दिवशी सकाळी घरात चोरी झाल्याचे नजरेस पडल्यानंतर त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाले यांच्या मार्गदर्शनाखाली डी . बी . पथकाचे उपनिरीक्षक विक्रम वडणे , कर्मचारी प्रदीप ससाणे , सानप , मांडे पाटिल यांच्या पथकाने तपास करून घटनेनंतर अवघ्या काही तासांत संशयित आरोपी आकाश उर्फ गयब्या ला ताब्यात घेतले . त्याची कसून चौकशी केली असता . गयब्याने गुंह्याची कबुली देत अल्पवयीन साथीदारासोबत ही घरफोडी केल्याचे सांगितले . चोरी केलेला माल घरात लपवून ठेवल्याचे सांगितले . पोलिसांनी पंचासमक्ष प्रियांका यांच्या घरातून चोरी झालेला सर्व ऐवज जसेच्या तसे जप्त केले .
आरोपी गयब्या अट्टल घरफोड्या
आरोपी गयब्या उर्फ आकाश हा बालपणापासून चोऱ्या करतो . आताही तो घरफोडी करताना अल्पवयीन मुलांना सोबत घेतो . चोरी करुन मिळालेल्या पैशातून साथीदार मुलांसोबत नशापाणी करतो . उस्मानपुरा पोलिसांनी पंधरा दिवसापूर्वी त्याला अटक करून किराणा दुकान , मोबाईल शॉपी , कापड दुकान आणि औषधी दुकान फोडल्याची गुन्हे उघडकीस आणली होती . या गुंह्यात न्यायालयाने त्याला जामीनवर सोडल्यानंतर त्याने घरफोडी केली.