अट्टल दुचाकीचोर धन्या पिंपळे जेरबंद; सव्वा तीन लाखाच्या १२ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 12:23 PM2021-03-27T12:23:00+5:302021-03-27T12:25:52+5:30
वाळूज एमआयडीसी परिसरात दुचाकी चोरणारा अट्टल दुचाकीचोर धनंजय उर्फ धन्या पिटोरे-पिंपळे हा बुधवार (दि.२४) रांजणगाव परिसरात येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना दिली होती.
वाळूज महानगर : जोगेश्वरी येथील अट्टल दुचाकी चोर धनंजय उर्फ धन्या पिंपळे (३०) यास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी धनंजय उर्फ धन्या याच्या ताब्यातून सव्वातीन लाखाच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.
वाळूज एमआयडीसी परिसरात दुचाकी चोरणारा अट्टल दुचाकीचोर धनंजय उर्फ धन्या पिटोरे-पिंपळे हा बुधवार (दि.२४) रांजणगाव परिसरात येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना दिली होती. ही माहिती मिळताच आरोपी धनंजय उर्फ धन्या यास पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून त्यास शिताफीने जेरबंद केले. आरोपी धनंजय यास पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने दोन-चार दिवसापूर्वीच रांजणगाव परिसरातील शिवनाथ जाधव यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.२०, ई.पी.०९९५) चोरल्याची तसेच गत ३ वर्षापासून एमआयडीसी वाळूज परिसरातून काही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलीस कोठडीत आरोपी धनंजय याने वाळूज एमआयडीसी परिसरातून तब्बल १२ दुचाकी चोरुन या दुचाकी परजिल्ह्यात विक्री केल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक गौतम वावळे, सहायक फौजदार कय्युम पठाण, गुन्हे शाखेचे सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, पोलीस नाईक प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, शिपाई नवाब शेख, विनोद परदेशी, मनमोहन कोली, हरिकराम वाघ, रेवन्नाथ गवळे, दीपक मतलबे, धर्मराज गायकवाड आदींनी कामगिरी बजावली.
अवघ्या पाच-दहा हजारात दुचाकीची विक्री
पोलीस तपासात धनंजय याने नाशिक, श्रीरामपूर व शेगाव परिसरात दुचाकी विक्री केल्याची कबुली दिली. आरोपी धनंजय याने हारेगाव-रांजणी ता. श्रीरामपूृर येथे ६ दुचाकी लपवून ठेवल्याचे तसेच सोलेसावंगी ता. शेवगाव येथून ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या.