रांजणगावात एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:04 AM2021-04-23T04:04:11+5:302021-04-23T04:04:11+5:30
वाळूज महानगर : रांजणगाव येथील एटीएम मशीन फोडून रोख रक्कम लांबविण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री ...
वाळूज महानगर : रांजणगाव येथील एटीएम मशीन फोडून रोख रक्कम लांबविण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री रांजणगावातील कमळापूर रोडवर घडली असून, चोरीचा प्रयत्न करणारे दोघे भामटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
कमळापूर रोडवर एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये बुधवारी मध्यरात्री ११.५७ मिनिटाच्या सुमारास दोन तरुण घुसले. दोघांनी तीक्ष्ण हत्याराच्या साह्याने एटीएमच्या डिस्प्लेचा लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या एटीएम केंद्रात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे एटीएमची देखरेख पाहणाऱ्या हेमब सोल्युशन कंपनीच्या अधिकाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. त्यामुळे त्यांनी एटीएममधील सायरन वाजविला. अचानक सायरन वाजल्याने चोरटे पसार झाले. याप्रकरणी कंपनीकडून सुरक्षा अभियंता आशिष चव्हाण व एमआयडीसी वाळूज पोलिसांना ही माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
चौकट
आठ ते दहा लाखांची रक्कम
सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्यांचे वय अंदाजे २० ते २२ वर्षं असून, दोघांनी जॅकेट टाइप स्वेटर व टोपी परिधान केली आहे. तोंडाला मास्क बांधले आहे. एटीएममध्ये जवळपास ८ ते १० लाखांची रोकड असल्याचे कंपनीतर्फे पोलिसांना सांगण्यात आले. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.