आरक्षणावरून बहुजनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
By Admin | Published: January 7, 2017 11:05 PM2017-01-07T23:05:18+5:302017-01-07T23:08:26+5:30
लातूर : आरक्षणासाठी मराठा समाजासह बहुजन समाजाचे मोर्चे निघत आहेत़
लातूर : आरक्षणासाठी मराठा समाजासह बहुजन समाजाचे मोर्चे निघत आहेत़ या आरक्षणावरून बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न राजकीय व्यवस्थेकडून होत आहे़ हा त्यांचा डाव वेळीच ओळखणे गरजेचे आहे़ नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकार का घेत नाही, असा सवालही महाराष्ट्र हमाल मापाडी पंचायत महामंडळाचे अध्यक्ष डॉ़बाबा आढाव यांनी येथे शनिवारी केला़
अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या ३८ व्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ विचारमंचावर स्वागताध्यक्ष प्रा़एस़ व्ही़ जाधव, उद्घाटक डॉ़ बशारत अहमद, अॅड़ वसंत फाळके, उत्तमराव पाटील, डॉ़ अशोक चोपडे, प्रा़ जी़ए़ उगले यांची उपस्थिती होती़ प्रारंभी जातीच्या उतरंडीवर बाबा आढाव यांच्या हस्ते फुली मारण्यात आली़ यावेळी ते म्हणाले, जातीअंताचे बिमोड करणारे शिक्षणही दिले जात नाही़ जात ही पूर्णपणे अवैज्ञानिक आहे़ स्वातंत्र्यानंतरही जातव्यवस्था अधिक बळकट झाली आहे़ नोटाबंदीचा निर्णय जसा घेतला तसा जात बंदीचा निर्णयही सरकारने घ्यायला हवा, असेही डॉ़बाबा आढाव म्हणाले़ आरक्षणाच्या माध्यमातून बहुजन, ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा डाव इथल्या राजकीय व्यवस्थेचा सुरू आहे़ शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही़ शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यानंतर जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते़ शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर हमीभाव दिला पाहिजे़ ज्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता आली ती माणसे अधिक धार्मिक झाली़ भविष्यात या राजकीय व्यवस्थेडून होणाऱ्या संविधान बदलाचा धोका आहे़ तो वेळीच हाणून पाडला पाहिजे़ त्यासाठी प्रत्येक सत्यशोधकीने सजग आणि दक्ष राहिले पाहिजे असेही ते म्हणाले़ यावेळी उद्घाटक बशारत अहमद यांनीही मार्गदर्शन केले़ अधिवेशनाला लातूरसह सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, औरंगाबाद, वर्धा, सातारा, मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून आलेल्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़